आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बदनामी थांबवावी:पत्रकार परिषदेत आवाहन
पुणे : ‘भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिमाखात साजरी करण्यावर आम्ही ठाम असून डी.जे. मुक्त आंबेडकर जयंतीच्या नावाखाली चळवळीची गळचेपी करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे सचिव व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुनिल माने यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत आंबेडकरी चळवळीतील नेते परशुराम वाडेकर व कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करुन,तक्रारी दाखल करून चालू असलेला बदनामीचा प्रयत्न थांबवावा ‘,असा इशारा आज पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांनी दिला.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. परशुराम वाडेकर,नागेश भोसले,सचिन गजरमल,बाळासाहेब जानराव,राहुल डंबाळे,किरण आल्हाट,संजय आल्हाट,तानाजी ताकपेरे यांच्या सह अनेक मान्यवर या पत्रकार परिषदेत उपस्थित होते .
दरम्यान,आज सकाळी आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांनी परशुराम वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली खडकी पोलीस स्टेशन मध्ये जावून सुनील माने यांच्या विरोधात समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नाविरोधात,तसेच पोलीस यंत्रणेची दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल करावा,अशा आशयाचे निवेदन दिले.
दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. ‘पुण्यात अनेक सण ,जयंत्या,उत्सव जाहीररीत्या साजरे होतात.त्यात विविध वाद्ये,स्पीकर आणि डी.जे. लावले जातात . मात्र,नुकत्याच झालेल्या उत्सवात प्लाझ्मा ,डिजिटल स्पिकर्स तसेच लेझर लाईट मुळे डोळे आणि कानांना इजा होण्याचे प्रकार घडले.आधुनिक ध्वनी,लेझर लाईट च्या शोधात असलेल्या कार्यकर्त्यांनी चायनीज गोष्टी ऑनलाईन मागविल्याने आणि त्यांना या यंत्रणेच्या दुष्परिणामांची कल्पना नसल्याने काही जणांना इजा झाली. त्यानंतर सुनील माने यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती डी.जे.मुक्त करण्यासाठी म्हणून एका हॉटेलात काही कार्यकर्त्यांची बैठक बोलवली.प्रत्यक्षात माने यांचा आंबेडकरी चळवळीशी काही संबंध नसून ते भाजप आणि संघाशी संबंधित व्यक्ती आहेत.त्यांनी एकतर हॉटेलात बैठक न घेता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते घेतात अशा आंबेडकर सांस्कृतिक सभागृह ,स्टेशन जवळील आंबेडकर पुतळा ,विहार अशा ठिकाणी बैठक बोलवायला हवी होती .
बैठकीनंतर त्यांनी दिलेल्या पत्रकांमुळे पुण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आगामी वर्षातील डॉ आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. म्हणून आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मालधक्का येथे डॉ आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात बैठक बोलावून अधिकृत भूमिका ठरवली . डॉ आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करण्याबाबत निःसंदिग्ध भूमिका जाहीर करण्यात आली. या बैठकीलाही सुनील माने यांना बोलाविण्यात आले होते . मात्र ,ते आले नाहीत .दरम्यान,सुनील माने यांनी पत्रकार परिषद घेऊन चळवळीतील कार्यकर्त्यांवर गुंडगिरीचे आरोप केले ,गुन्हे दाखल केले.
‘आम्ही डॉ आंबेडकर यांच्या विचारातील चळवळीचे कार्यकर्ते आहोत ,गुंड नाही .आमची हयात आंबेडकर जयंती साजरी करण्यात गेली आहे . तसेच जयंती जल्लोषात साजरी करणे हा गुन्हा नाही ,हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली . डॉ आंबेडकर जयंतीत कोणालाही इजा होईल अशी ध्वनी आणि प्रकाश यंत्रणा वापरली जात नाही ,जाणार नाही . कायद्याच्या परिभाषेत मान्यता असणाऱ्या गोष्टीच वापरल्या जातात ,आणि पुढेही वापरल्या जातील’ ,असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. ‘सुनील माने किंवा अन्य कोणीही त्याबाबत उठाठेवी करू नये’ ,असेही यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.
डॉ आंबेडकर यांची जयंती केवळ मिरवणुकीपुरती नसते अनेक वैचारिक ,प्रबोधनपर उपक्रम ,जलसे सुरु असतात. ‘वर्षभर वाचू ,एक दिवस नाचू ‘,ही आमची भूमिका आहे . केवळ डॉ आंबेडकर जयंती नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीतील सर्व उत्सव ,जयंती आम्ही प्रगल्भपणे साजरी करीत असतो ,असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले
सुनिल माने यांनी आपण भाजपाचे पदाधिकारी आहोत हे लपवण्याचे कारण काय ?
आंबेडकर जयंतीत स्पिकरचा वापर असावा या संदर्भात असलेल्या बैठकीचा हवाला देत सुनील माने यांच्या पत्रकार परिषदेत आम्ही न केलेल्या वक्तव्यांची खोटेपणाने वाच्यता केलेली आहे. वास्तविक पाहता आमच्या बैठकीत परशुराम वाडेकर यांनीच ज्यांची समाजात ओळख नाही अशा व्यक्तिंची नावे घेवु नका , नावे घेवुन कोणालाही मोठे करु नका. असे आवाहन केले होते .दुसरी गोष्ट म्हणजे ,सुनिल माने यांनी आपण भाजपाचे पदाधिकारी आहोत हे लपवण्याचे कारण काय ? तरीही माने यांनी परशुराम वाडेकर यांनी धमकी दिल्याचे त्यांच्याकडील पुरावे पुढे आणावेत अथवा कार्यकर्त्यांची माफी मागावी,असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636