आगामी हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी महिला उद्योजिकांची परिषद – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


पुणे : उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन चांगले काम करत असून हे एकमेव राज्य आहे जिथे महिला उद्योग धोरण तयार करण्यात आले आहे. आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्योजक महिलांची परिषद आयोजित करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र शासन उद्योग विभाग आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर येथील सिंचन भवन मैदानावर आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड मायटेक्स एक्स्पो या प्रदर्शनाला डॉ. गोऱ्हे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देऊन उद्योजकांसोबत संवाद साधला. यावेळी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, आयोजित करण्यात येणाऱ्या परिषदेत विदर्भातील महिला आणि उद्योग क्षेत्रातील यशस्वी महिला त्यांना आलेले अनुभव मांडतील. येत्या ३० ऑक्टोबर रोजी व्यापार आणि उद्योजकांच्या प्रश्नावर सचिवांसोबत बैठक घेतली जाईल. ऑनलाईन व्यापाराच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकारकडून काय मदत करता येईल याबाबत चर्चा करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

डायमंड ज्वेलरीचा हब स्थलांतरित होत असल्याचा प्रचार चुकीचा – उद्योगमंत्री उदय सामंत

डायमंड ज्वेलरीचा हब गुजरात राज्यात स्थलांतरित होत असल्याचा प्रचार चुकीचा आहे, असे सांगून उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्र शासनाने डायमंड ज्वेलरीमध्ये उत्तम काम करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी धोरण आणले. नवी मुंबई येथे नव्याने विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळानजिक २५ एकरची जागा डायमंड ज्वेलरी पार्कसाठी दिली आहे. पुढील वर्षीपासून महाराष्ट्रातील डायमंड ज्वेलरी मधील व्यापार प्रचंड वाढणार असून जगातील या क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावर राज्य असेल असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

Advertisement

शासन शंभर टक्के उद्योजक आणि व्यापाऱ्यांसोबत आहे. विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लवकरच मुंबईत संबंधित सर्व विभागांचे अधिकारी, सचिवांसोबत बैठक घेतली जाईल. या बैठकीतून उद्योग, व्यापाराचे बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

श्री. सामंत पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चेंबर राज्यातील व्यापार आणि उद्योगांच्या वाढीसाठी संयुक्तपणे काम करत आहे. महाराष्ट्र चेंबरच्या कामाचा फायदा शासनालाही होत असून महसूल वाढीबरोबरच, तरुणांना रोजगार मिळत आहे. राज्यात उद्योग, व्यवसायांना मोठे प्रोत्साहन मिळत आहे. उद्योगांचे अनेक प्रश्न शासनाकडून मार्गी लागले आहेत आणि उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील. विविध सवलती, प्रोत्साहनाचे ७ हजार ५०० कोटी रुपये उद्योजकांच्या खात्यात वर्ग केला आहे.

प्रकल्प उभारताना त्या गावातील स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य दिल्यास वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. उद्योग व व्यापाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे शासनाची भूमिका आहे. खासगी क्षेत्रात सेमी कंडक्टरचा प्रकल्प उभारण्यासाठी आर्यन ग्रुप ऑफ कंपनीने घेतलेल्या पुढाकाराला पाठबळ दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबर व्यापारी आणि उद्योजकांसाठी कार्यरत आहे. मायटेक्सच्या माध्यमातून राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राला चालना, प्रोत्साहन देण्यात येत आहे. शासनाकडून तात्काळ निर्णय घेतले जात असल्याने उद्योगक्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी उद्योगमंत्री सावंत यांच्या माध्यमातूनच मायटेक्सची संकल्पना रूजली, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात मायटेक्स एक्स्पो मुंबई २०२४ च्या माहितीपत्रिकाचे अनावरण करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे चेअरमन मनोहर जगताप, महाराष्ट्र चेंबरचे मायटेक्सचे पुणे विभागाचे मुख्य संयोजक दिलीप गुप्ता आदींचा सत्कार झाला.

शिवाजीनगरातील सिंचन भवन येथील मैदानावर २९ ऑक्टोबर पर्यंत प्रदर्शन असून दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत अशी वेळ आहे.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page