पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वीज पुरवठा विस्कळीत; महानगरपालिकेच्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी
पुणे, प्रतिनिधी:- सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक पेठांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत.
ज्ञानप्रबोधिनी भागात कालपासून वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तक्रारी केल्या. त्यामुळे शिवसेनाच्या वतीने नारायण पेठेतील महावितरण केंद्रावर चौकशी केली असता तेथून मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेच्या रस्ता दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांकडून वेळोवेळी महावितरणच्या केबलचे नुकसान केले जाते. त्यामुळे पेठेतला वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे.
त्यामुळे शिवसेनेकडून संबंधित घटनेची आणि ठेकेदारांची चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेण्याची मागणी शिवसेना पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांनी केली. यासाठी पुणे महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आणि महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. योग्य कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने महावितरणावर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636