महावितरणकडून मिरवणूक मार्गावर दक्षता
विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन
पुणे न्यूज एक्सप्रेस :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
कोल्हापूर परिमंडळ: महावितरणच्या यंत्रणेकडून गणेशोत्सव काळात ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होण्यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. महावितरणकडून स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून मिरवणूक मार्गावर आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.गणेशमुर्ती विसर्जनाची मिरवणुक निर्विघ्न पार पडण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे महावितरणचे आवाहन आहे.
गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकी दरम्यान विद्युत यंत्रणेतील विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर ), विद्युत खांबास ताण दिलेली तार, भूमिगत वाहिनींचे फिडर पिलर इ. पासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. गणेश भक्तांनी व मंडळ कार्यकर्त्यांनी विद्युत खांब, रोहित्रे, फिडर पिलर इ.वर चढू नये. मिरवणुकीत लोखंडी/ धातूच्या रॉडच्या झेंड्यांचा, वाहनात किंवा वाहनाच्या टपावरील कार्यकर्त्यांचा विद्युत वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मिरवणुकीसाठी विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकुन वीज वापर करु नये.
महावितरणकडून मिरवणुक मार्गावर व विसर्जनाचे ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. मंडळ कार्यकर्त्यांनी आपात्कालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कोल्हापूर (7875769103) व सांगली (7875769449) कक्षाशी संपर्क साधावा.