सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नियम डावलून पदोन्नत्या…
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांना विभागीय परीक्षा न घेता पदोन्नत्या दिल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार संबंधित कार्यालयाने विभागीय पदोन्नती परीक्षा घेऊन त्यामध्ये उत्तीर्ण असलेल्यांना पदोन्नत्या द्याव्यात असा नियम आहे.
Advertisementसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वर्ष १९८७ पर्यंत विभागीय पदोन्नती परीक्षा घेतल्या गेल्या होत्या. वर्ष २०१० मध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विभागीय पदोन्नती परीक्षा आयोजित करणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या १६ वर्षांमध्ये या परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत. सदर बाब एका कर्मचाऱ्याने निवेदनाद्वारे विद्यापीठाचे कुलगुरू, प्र- कुलगुरू, कुलसचिव, उपकुलसचिव प्रशासन- शिक्षकेतर यांचे निदर्शनास आणली. परंतु त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केल्याने मा. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणली. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पदोन्नती समिती आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती देताना या समितीची सभा होते व त्यांच्या शिफारशीनुसार पदोन्नत्या दिल्या जातात. या पदोन्नती समितीमध्ये गेली पंधरा वर्षे विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी असलेले एक तज्ञ कार्यरत आहेत. या तज्ञानी विद्यापीठ कायदा या विषयावर पीएच.डी. केली आहे. तसेच महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या समितीमध्ये त्यांनी सदस्य म्हणून देखील काम केले आहे. या तज्ञाने सदर गंभीर बाब विद्यापीठ प्रशासन व शासनाच्या निदर्शनास आणली आहे किंवा नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.
विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर मा. संचालक व सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य हे सदस्य आहेत. त्यांनी विद्यापीठ अधिकार मंडळाच्या सभेमध्ये किंवा पत्राद्वारे सदर बाबतीत उचित कार्यवाही करणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय हितसंबंधावर भाष्य करणाऱ्या तज्ञांनी स्वतःच्या घरात काय चालले आहे? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासंदर्भात काही कर्मचारी व अधिकारी नाराजही आहेत.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636