संगीतात देव शोधणारा देव माणूस :पंडित यशवंत देव
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
शुक्रतारा मंद वारा ,स्वर आले जुळूनी,भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी ही गाणी माहित नाहीत असा मराठी माणूस नाही. याच पद्धतीची शब्दशः शेकडो गाणी संगीतबद्ध करून मराठी रसिक मनाला गेली साठ वर्षे अमिट व अविट आनंद देणारे ज्येष्ठ संगीतकार ,गीतकार, वाग्गेयकार, पंडित यशवंत देव यांचा ३० ऑक्टोबर हा स्मृतिदिन. वाक म्हणजे वाणी आणि पद म्हणजे गेय, म्हणजे गायले जाणारे ,म्हणजे स्वरताल युक्त पद किंवा पद्यरचना करणारा तो वाग्गेयकार. वाग्गेयकाराला साहित्य आणि संगीत या दोन्हीचे उत्तम ज्ञान असावे लागते .भारतीय संगीत परंपरेत पंडित शारंगदेव ,पंडित जयदेव या प्राचीन काळातील वाग्गेयकारांपासून
दीर्घ परंपरा आहे .पंडित यशवंत देव हे त्याच परंपरेतील आहेत यात शंका नाही.१ नोव्हेंबर १९२६ रोजी जन्मलेले पंडित यशवंत देव ३०ऑक्टोबर २०१८ रोजी कालवश झाले. अखेर पर्यंत उत्साहात खळाळणार आणि समोरच्यालाही उत्साही बनवणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. पंडितजींच्या अर्धांगिनी करुणाताई ५ जून २०११रोजी कालवश झाल्या. करुणाताई स्वतःही एक जाणत्या कलावंत व रसिक होत्या. आकाशवाणीचा एक काळ करुणाताईंनी फार गाजवलेला होता .देवांनी अनुभवलेल्या सुवर्णयोगाच्या त्या सर्वार्थाने साक्षीदार होत्या. अतिशय सरळ,मायाळू आणि हळव्या स्वभावाचे पंडितजी कमालीचे हळवेही होते. डोळ्यात तरळणाऱ्या पाण्याला क्षणार्धात दूर करून काहीतरी मिश्किल कोटी करू शकणारे पंडितजी हे खऱ्या अर्थाने देवमाणूस होते.
पंडित यशवंत देव आणि माझे जिव्हाळ्याचे नाते होते. ‘ गझल ‘ हा त्या नात्याचा गाभाघटक होता. पंचवीस तीस वर्षाच्या काळात शब्दशः माझ्या शेकडो शेरांवर पंडितजींनी पत्रांमधून लिखित स्वरूपात केलेले भाष्य हा माझा अनमोल स्वरूपाचा व्यक्तिगत ठेवा आहे. २०१० साली माझा ‘ गझलसाद ‘ हा संग्रह आला. त्याला पंडित यशवंत देव यांनी ‘गझल प्रसाद ‘या नावाने प्रस्तावना लिहिली होती. त्याचे प्रकाशनही पंडितजींच्याच हस्ते झाले होते. प्रस्तावनेत त्यांनी लिहिले होते ,’ गझलचा दोन दोन ओळींचा आकृतीबंध अतिशय काटेकोरपणे सांभाळायचा आणि शिवाय, दुसऱ्या ओळीच्या शेवटी वाचकांकडून मनापासून दाद मिळवायची हे काम सोपे नव्हे .कविता लिहिणारा कवी आणि गझल लिहिणाराही कवीच. परंतु गझलकार कवी हा भन्नाट विचारवादळाने गुरफटलेला असतो.त्याच्या लिखाणात एक वेगळी धमक असते.
एक वेगळा प्रत्ययकारक अनुभव असतो. दोन ओळींचा ‘शेर ‘.त्यातल्या आकृतीबंधात नियमांबरोबरच एक सजीवता असते. जिवंतपणा असतो.त्यातल्या शब्दांना खरोखरच एक अक्षरत्व लाभलेले असते. आणि ‘गझलसादकार ‘प्रसाद कुलकर्णी हे असेच एक अवलीये शायर आहेत.गझलसाद मध्ये विविध विषय ठीक ठिकाणी आलेले आहेत .विधाने सरळ आणि स्पष्ट आहेत. लयकारीच्या अंगाने या गझला स्वरबद्ध होऊन मैफलित गायल्या गेल्या तर श्रोत्यांची नक्कीच दाद घेऊन जातील. या संग्रहातले अनेक शेर खरोखर लाजबाब आहेत.इर्शाद ,इर्शाद म्हणत आपणच ते पुन्हा पुन्हा वाचावेत असे आहेत. या गझलांमुळे मराठी साहित्याला एक रगेल बाळसे लाभले आहे असा मला भास होतो ‘….!प्रत्यक्ष पंडित यशवंत देव यांनी माझ्या गझलांबाबत असे लिहीले. त्यामुळे गझलकडे पूर्वीपेक्षा अधिक जबाबदारीने बघण्याची प्रेरणा माझ्यात निर्माण झाली हे मला नमूद केले पाहिजे.कालवश सुरेश भट उर्फ दादांच्या नंतर कवितेतील शब्द समर्थांची शिकवण मला पंडित यशवंत देव यांच्यामुळेच मला मिळाली आहे.
पूर्वसुरींबद्दल विनम्रता, समकालिनांविषयी आदर आणि उद्याच्या पिढीकडून आशा ज्याला निश्चित असते तो खरा कलावंत असतो. पंडितजींचा एकूण जीवनप्रवास पाहिला की त्यांच्यातील सच्चा महान कलावंताची ओळख होते. प्रत्येक काळामध्ये त्या त्या क्षेत्रातील शिखरे असतात. पंडित यशवंत देव हे असं त्याकाळचं संगीत क्षेत्रातील शिखर होतं. पंडितजींनी भावगीतांच्या उत्कर्षाचा कालखंड स्वतः त्यात सहभागी होत अनुभवला. पंडित यशवंत देव यांची सतारीसह अनेक वाद्यांवर हुकमत होती.त्याच कालखंडात हिंदी चित्रपट संगीतही ऐन तरुणाच्या भरात होते. अनिल विश्वाससारखा प्रतिभावंत संगीतकार संगीताची नवी परिभाषा निर्माण करत होता.या साऱ्याचा भाव पंडितजींसारख्या सुसंस्कारित कलावंतावर पडला नसता तरच नवल.
विविध वाद्ये लिलया हाताळणारे पंडितजी तत्कालीन कवींच्या आशय संपन्न, नादमय कवितांना स्वरबद्ध करू लागले.आकाशवाणीत तब्बल २६ वर्षे त्यांनी सेवा केली.आणि हा संपूर्ण कालखंड त्यांनी मराठी संगीतकला सर्वार्थाने विकसित करण्यासाठी व्यतीत केला. अनेक कवितांना ,नाटकांना, चित्रपटांना, नृत्यनाट्याना ,भावगीताना संगीत देऊन त्या कलाकृती आजरामर केल्या.स्वतःही एक उत्तम कवी, गीतकार असलेले पंडितजी ‘देवगाणी ‘किंवा इतर कार्यक्रमातून, कार्यशाळातून खुलत असत. त्यांचे बोलणे ऐकणे हे आपण स्वतः कलेच्या दृष्टीने श्रीमंत झाल्यासारखं वाटायला लावायचं.
पंडित यशवंत देव यांनी आपल्या वर्षानुवर्षाच्या चिंतनातून १९७८ साली ‘शब्दप्रधान गायकी ‘ हे अनमोल पुस्तक लिहिलं .त्याद्वारे त्यांनी शब्द आणि सूर यांच्यातील नात्याचे, गीतांच्या निर्मितीचे एक शास्त्र मांडले. सुगम संगीताची शास्त्रीय चर्चा त्यांनी घडवून आणली. पंडितजी सदैव गीत आणि संगीताच्याच विश्वात वावरत असत .जो माणूस ज्या जगात जगत असतो त्या जगाचा त्याच्या अंतरंगात दिव्य साक्षात्कार घडून येत असतो. हे त्याच्या कलाकृतीकडे पाहताना आवर्जून जाणवते. शब्द प्रधान गायकी इतकीच कवितेबाबतही त्यांची मते फार प्रगल्भ होती. त्यांच्या मते ‘ कवितेची गेयता ही स्वयंसिद्ध असावी. चाल लावल्यानंतर कुठलीही कविता किंवा मजकूर स्वरसंपन्न होईल. त्यात विशेष काही नाही. तारुण्य हे स्वयंसिद्ध असायला हवे. तसेच कवितेचे आहे कविता स्वयंभूपणे गेय असते, असावी.चाल हे केवळ निमित्त आहे.’
पंडित यशवंत देव ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक श्रीमंती होती .त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण त्यांना रसिकांनी सदैव दिलेली दाद हा सर्वोच्च पुरस्कार होता. पंडित यशवंत देव आणि करुणाताई माझ्या घरी आलेले होते .मीही त्यांच्या घरी गेलेलो होतो. त्याही साऱ्या भेटी जशाच्या तशा आठवत असतात.विसरशील खास मला, विठ्ठल किती गावा ,निर्गुणाचे भेटी, चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा,अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हे श्याम सुंदरा, अजून त्या झुडपांच्या मागे ,काटा रुते कुणाला , सूर मागू तुला मी कसा ना, चांदणे शिंपीत जाशी, ही वाट दूर जाते ,येरे घना येरे घना, भावनांचा तू भुकेला, कुणी काही म्हणा , नाविका रे यासारखी शब्दशः शेकडो गाणी स्वरबद्ध करणाऱ्या या देवमाणसाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन ….!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636