समाजवादी विचारसरणी व जनतेच्या प्रश्नांवर आधारित कार्यक्रम इंडिया आघाडीला विजयी करु शकेल : परिषदेतील सूर
समाजवादी विचारसरणी व जनतेच्या प्रश्नांवर आधारित कार्यक्रम इंडिया आघाडीला विजयी करु शकेल : परिषदेतील सूर
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : ‘देशातील लोकशाही व संविधान यांचे संरक्षण करण्यासाठी समाजवादी विचारसरणीच्या आधारेच जनतेसमोर जावे लागेल. याबरोबरच वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दलित व अल्पसंख्याकांवरील अत्याचार, शेतकऱ्यांचा आक्रोश अशा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित कार्यक्रम या आधारेच इंडिया आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तापालट करु शकेल’, असा सूर समाजवादी विचारवंत व कार्यकर्ते यांच्या पुणे येथील साने गुरुजी स्मारक भवन येथे झालेल्या राज्यस्तरीय व्यापक परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
‘ इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख घटक पक्षांनी संतुलित भूमिका घ्यावी’ असे आवाहनही करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व माजी आमदार डॉ.कुमार सप्तर्षि, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुभाष वारे, विद्यमान अध्यक्ष सुभाष लोमटे, एडव्होकेट राम शरमाळे इ. मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पन्नालाल सुराणा यांनी समक्ष येता न आल्यामुळे संदेश व शुभेच्छा दिल्या.
देशाला पुरोगामी विचार महाराष्ट्राने दिला असून समाजवादाची पाळेमुळे महाराष्ट्रात खोलवर रुजलेली असून समाजवादाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला, तर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट मत डॉ .कुमार सप्तर्षी यांनी या परिषदेमध्ये व्यक्त केले. आज देशात लोकशाही संपुष्टात आले असून अघोषित आणीबाणी केंद्र सरकारने लादलेली आहे. त्यामुळे भाजपा सरकारला सतेतून बाहेर काढणे हा एकमेव उद्देश समोर ठेवून येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व समाजवादी कार्यकर्त्यांनी झोकुन कामाला लागावे असेही आवाहन डॉ .कुमार सप्तर्षी यांनी केले.
महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला समाजवादी विचाराची गरज असून समाजवादी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पंचायत पासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये सक्रिय राहून लोकशाहीचा खून करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेबाहेर काढण्यासाठी जीवाचे रान करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. सुभाष वारे यांनी केले. देशाची घटना सुरक्षित ठेवणे हे देशातील सर्व सामाजिक संघटना, सामाजिक विचारवंत व समाजवादी पक्षाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट मत यावेळी बोलताना राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष सुभाष लोमटे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनासाठी समाजवादी पार्टी संपूर्ण शक्तीनिशी तयार असून येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला सतेतून बाहेर काढण्यासाठी सर्व कार्यकत्यांनी जीवाचे रान करावे असे आवाहन समाजवादी पार्टीचे कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी केले आहे.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष डॉ पी. डी. पाटोदेकर यांनी तर आभार प्रदर्शन समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते अॅड रेवण भोसले यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये प्रा. शरद जावडेकर, विठ्ठल सातव, शिवाजीराव परुळेकर, अनिस अहमद, राहुल गायकवाड, प्रताप देसाई, विनायक लांबे, वाल्मीक घाडगे, कुमार राऊत, जितेंद्र सतपाळकर, प्रशांत दांडेकर, अशोक गायकवाड, उषा कांबळे, दत्ता पाकीरे, साधना शिंदे, प्रशांत दांडेकर इ. प्रमुखांनी चर्चेत भाग घेतला. या परिषदेस राज्याच्या विविध भागातील समाजवादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636