अबुझमाड मलखांब अँड स्पोर्ट्स अकॅडेमीने जिंकला ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा किताब
मुंबई : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘विजयी विश्व हुनर हमारा’ सार्थकतेने साजरा करणाऱ्या इंडियाज गॉट टॅलेंट या लोकप्रिय रियालिटी शोच्या यंदाच्या अप्रतिम सीझनची सांगता ‘हुनर का विश्व कप’ फिनालेद्वारे झाली. जवळजवळ गेले चार महीने या शोमध्ये देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या असामान्य प्रतिभेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. शिल्पा शेट्टी कुंद्रा, किरण खेर आणि बादशाह सारखे मोठे कलाकार या शोमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर होते तर अर्जुन बिजलाणीने या शोचे सूत्रसंचालन केले. टॉप 6 स्पर्धकांमध्ये रंगलेल्या अंतिम लढतीसाठी या परीक्षकांसोबत प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि मागच्या सीझनच्या अंतिम फेरीत धडक मारणारे ऋषभ चतुर्वेदी आणि इशिता विश्वकर्मा देखील विशेष पाहुणे म्हणून हजर होते. फिनालेमध्ये सर्वांची उत्कंठा वाढवत अखेरीस महिला बॅंड, गोल्डन गर्ल्स, झीरो डिग्री, रागा फ्यूजन आणि द ART या अन्य टॉप स्पर्धकांवर मात केली ती अबुझमाड मलखांब अँड स्पोर्ट्स अकॅडेमीने!
‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या या सत्राचे विजेते म्हणून अबुझमाड मलखांब अँड स्पोर्ट्स अकॅडेमी या ग्रुपला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनकडून तब्बल 20 लाख रु.चा चेक प्रदान करण्यात आला. शिवाय, मारुती सुझुकी इंडिया लिमटेडचे सीनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मार्केटिंग अँड सेल्स श्री. शशांक श्रीवास्तव यांच्या हस्ते विजेता ग्रुपला एक नवी कोरी मारुती सुझुकी अर्टिगा पुरस्काराच्या रूपात देण्यात आली. भारतीय शास्त्रीय फ्यूजन बॅंड रागा फ्यूजन (लुधियानाचा जयंत पटनाईक, मध्यप्रदेशचा अजय तिवारी, पटणाचा अमृतांशु दत्ता आणि पटणाचाच हर्षित शंकर) यांनी दुसरा क्रमांक पटकावला. त्यांना 5 लाख रु. च्या चेकसोबत या सीझनमध्ये सर्वाधिक गोल्डन बझर जिंकल्याबद्दल गो चीजकडून एक गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. कोलकाताहून आलेला प्रतिभावान डान्स ग्रुप गोल्डन गर्ल्सने तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस जिंकले. त्यानं देखील 5 लाख रु. चा चेक देण्यात आला. अंतिम फेरीतील सर्व टॉप 6 स्पर्धकांना टेक्नो कॅमन 20 प्रो 5जी स्मार्टफोन आणि पतंजलि गिफ्ट हॅम्पर देण्यात आले.
अबुझमाड मलखांब अँड स्पोर्ट्स अकॅडेमीचा इंडियाज गॉट टॅलेंट मधील प्रवास अत्यंत प्रेरणादायक होता. छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या अबुझमाड मलखांब अकादमीने निष्ठा आणि चिकाटीचे उदाहरण सादर करत हे सिद्ध करून दाखवले की, जर तुम्ही आपल्या कलेशी प्रामाणिक राहिलात आणि ‘छत्तीसगढिया सबसे बढिया’ ही खूणगाठ मनाशी बांधली, तर अशक्यप्राय गोष्टी देखील साध्य होतात. अत्यंत कुशलतेने आणि सफाईने सादर केलेले त्यांचे जबरदस्त अॅक्टपाहून सर्व परीक्षक आणि देश अचंबित झाला. या शोमधला त्यांचा प्रवास पाहून अत्यंत प्रभावित झालेल्या किरण खेर आणि बादशाह या दोघा परीक्षकांनी तर या कला प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या अकादमीला वित्तसहाय्य करण्याचे देखील वचन दिले.
अबुझमाड मलखांब अँड स्पोर्ट्स अकॅडेमीचे त्यांच्या या अद्भुत विजायबद्दल अभिनंदन आणि भावी वाटचालीत यश प्राप्तीसाठी खूप खूप शुभेच्छा!
टिप्पण्या:
मनोज प्रसाद – इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 10 चे विजेता अबुझमाड मलखांब अँड स्पोर्ट्स अकॅडेमीचे कोच
हे अगदी स्वप्नवत वाटते आहे; अबुझमाड मलखांब अँड स्पोर्ट्स अकॅडेमीचे जणू स्वप्नच पूर्ण झाले आहे. भारतातील एका देशी क्रीडाप्रकाराचा प्रचार करण्याच्या आणि या प्राचीन मार्शल आर्ट प्रकाराच्या माध्यमातून प्रेक्षकांना आनंद देण्याच्या उद्देशाने आम्ही या प्रवासाची सुरुवात केली होती. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये आमचा सहभाग म्हणजे आमच्या अकॅडेमीच्या बाहेर आम्ही उचललेले पहिले पाऊल होते. इंडियाज गॉट टॅलेंट हा किताब आणि बक्षीसाची रक्कम जिंकल्यामुळे आम्हाला आमच्या अकॅडेमीचा विकास करण्यासाठी आणि होतकरू स्थानिक खेळाडूंना अधिक संधी मिळवून देण्यासाठी साधन-संपन्नता प्राप्त झाली आहे. आम्हाला आमचे कौशल्य सादर करण्यासाठी आणि इतर अनेक तरुणांना या क्रीडाप्रकाराचा परिचय करून देऊन त्याकडे त्यांना वळण्याची प्रेरणा देण्यासाठी आम्हाला हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही इंडियाज गॉट टॅलेंट आणि येतील परीक्षकांचे खूप आभारी आहोत. आम्हाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या आमच्या कुटुंबियांचे देखील खूप खूप आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या यशामुळे अधिक परिश्रम करण्यासाठी आणि आमच्या कक्षा विस्तारण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. आम्हाला आशा आहे की, आमचा हा प्रवास पाहून इतर अनेक तरुणांना देखील आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याचे बळ आणि प्रोत्साहन मिळेल.
शिल्पा शेट्टी कुंद्रा, परीक्षक, इंडियाज गॉट टॅलेंट
अबुझमाड मलखांब अँड स्पोर्ट्स अकॅडेमीचे मनःपूर्वक अभिनंदन. त्याची प्रतिभा, चिकाटी आणि निष्ठा यांचे फळ त्यांना मिळाले आहे. आणि मला वाटते हा किताब जिंकण्यासाठी ते खरोखर पात्र होते. प्रत्येक परफॉर्मन्समध्ये त्यांनी आपला आलेख उंचावत नेला होता. सहा वर्षांच्या सुरेशने तर त्याच्या निडर परफॉर्मन्सने माझे मन जिंकून घेतले आहे. परफॉर्म करताना एकमेकांवर जो विश्वास ते दाखवतात, त्यातून संघ भावनेची शिकवण मिळते. हा ग्रुप भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करेल अशी मला आशा आहे.
बादशाह, परीक्षक, इंडियाज गॉट टॅलेंट
अबुझमाड मलखांब ग्रुपचा उत्साह, निर्धार आणि पॅशन कौतुकास्पद आहे. आपली स्वप्ने त्यांनी कशी साकार केली आणि प्रतिकूलतेसमोर हार मानून त्यांनी कधी माघार घेतली नाही हे पाहून खूप आनंद होतो. तरुणांसाठी ते प्रेरणास्रोत बनले आहेत. मलखांब या कलाप्रकाराला देखील त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. मला आशा आहे की प्रामाणिकपणा आणि आपल्या पारंपरिक कला आणि क्रीडा प्रकाराचे जतन करून राष्ट्रीय स्तरावर ते सादर करण्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात आले असेल. या ग्रुपच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि आशा करतो की यशाचे शिखर ते सर करतील!
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636