सिम्बायोसिस संस्थेच्या नावाने बनावट वेबसाइटद्वारे अॅडमिशनच्या बहाण्याने विद्यार्थ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : सिम्बायोसिस संस्थेच्या नावाने बनावट वेबसाइटद्वारे अॅडमिशनच्या बहाण्याने विद्यार्थ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोलकत्ता विमानतळावरून अटक केली आहे. कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी ( ३०, रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याच्यासह दिव्या व आकाश यादव या दोन आरोपींविरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशन येथे दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या टोळीने पुण्यातील नामवंत सिम्बायोसिस संस्थेच्या लोगोचा वापर करून बनावट वेबसाइट तयार केली होती आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खोटे अॅडमिशन ऑफर देऊन लाखो रुपयांची मागणी केली जात होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होते. गुन्हे शाखेच्या पथकांनी दिल्ली, हरियाणा व महाराष्ट्रात वारंवार शोध मोहीम राबवूनही आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देत होते. अखेर लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आणि माहितीच्या आधारे ३१ मे २०२५ रोजी कोलकत्ता विमानतळावर सापळा लावून कुणालकुमारला अटक करण्यात आली.
तपासादरम्यान समोर आले की, आरोपीच्या विरोधात यापूर्वीही पुण्यात सायबर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, तो त्या प्रकरणातही फरार होता. त्याच्या अटकेनंतर त्यास पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून, ५ जून २०२५ पर्यंत पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे व सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, संदीप शिर्के, विशाल दळवी, मारुती पारधी यांचा समावेश होता.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636