प्रशासकीय खात्यातून झालेल्या व्यवहारांचे होणार लेखापरीक्षण
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : ससून रुग्णालयात उघडकीस आलेल्या ४ कोटी १८ लाखांच्या अपहार प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासकीय खात्यातून पूर्वी झालेल्या सर्व व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, यातून गेल्या काही वर्षांतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक आणि विभागप्रमुखांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवला होता. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ऑगस्टमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाच्या लेखापरीक्षकांनी ससूनमध्ये येऊन सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिला होता. त्यानुसार संबंधित ससूनमधील कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच बारामती येथे बदली झालेल्या या प्रकरणातील संबंधित चार कर्मचाऱ्यांचेही निलंबन करण्यात आल्याचे ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले.
रोखपालनेच रचला डाव
ससूनच्या प्रशासकीय अधिकारपदाचा अतिरिक्त कार्यभार रोखपाल अनिल माने याच्याकडे होता. त्यावेळी त्याने जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ कालावधीत बँक खात्यातील व्यवहारात अपहार केला. त्याने खात्यातील ४ कोटी १८ लाख रुपये ससूनमधील १६ कर्मचारी आणि ८ खासगी व्यक्तींच्या खात्यावर जमा केले. त्यानंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांनी एकाच बँकखात्यात जमा केली. याबदल्यात संबंधित कर्मचाऱ्यांना ठरावीक रक्कम देण्यात आली.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636