गुटखा लुटण्यासाठी पाठलाग ; दत्तवाड येथे अपघात, चाकूचा धाक आणि थरारक घटना
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पाचवा मैल–बोरगाव येथील एक इसम गुटखा घेऊन जात असल्याची माहिती इचलकरंजीतील काही अज्ञात युवकांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याचा पाठलाग करून चाकूचा धाक दाखवत गुटख्याची लूट केल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. दत्तवाडच्या दिशेने पलायन करताना या युवकांची लाल रंगाची टाटा नॅनो गाडी अपघातग्रस्त झाली. या घटनेने बेकायदेशीर गुटखा व्यापारातील टोळी युद्धाचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुटखा लुटण्याच्या उद्देशाने संबंधित वाहनाचा पाठलाग करत युवकांनी वाहन थांबवून गुटखा जबरदस्तीने आपल्या गाडीत घेतला आणि दत्तवाडच्या दिशेने पळाले. पाचवा मैल येथील मूळ गुटखा वाहून नेणाऱ्या व्यक्तीने तत्काळ त्यांचा पाठलाग करून दत्तवाड येथे संशयित आरोपींच्या वाहनाला अडवले. त्यावेळी घबरलेल्या आरोपींच्या टाटा नॅनो गाडीचा अपघात झाला.
घटनास्थळी दोन युवकांपैकी एकाने पळ काढला, तर दुसऱ्याला नागरिकांनी डांबून ठेवले. नागरिकांनी तत्काळ कुरुंदवाड पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच संशयित आरोपीला त्यांच्या ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, गाडीतील संपूर्ण गुटखा पुन्हा पाचवा मैल बोरगाव येथील मूळ इसमाने ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.
या प्रकरणामुळे गुटख्याच्या अवैध व्यापारातील वाढती स्पर्धा आणि त्यातून उभे राहणारे गुन्हे उघडकीस आले असून, या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा टोळ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
श्रीकांत कांबळे : पश्चिम महाराष्ट्र संपादक

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636