आठवणींच्या हिंदोळय़ावर झुलणारी दिवाळी…


महत्त्वकांक्षेची क्षितीजे जेव्हा रूंदावतात, तेव्हा समाधानाच्या आकांक्षा मात्र हरवत जातात. आयुष्यात एका टप्प्यावर पोहचल्यानंतर मागे वळून पाहिल्यावर लक्षात येत की, अरे…समाधानाने जगण्याचे दिवस खूप मागे पडले…. किती आनंदी अन् भारी दिवस होते ते… दिवाळीची चाहूल लागली की, अक्षरशः डोक्यात कल्ला व्हायचा आणि मन किल्ला, फराळ आणि हुंदडण्याकडे वळायचे. सध्याच्या दिवसात सुखसमृद्धी, करिअर झाले, पण आठवणींच्या हिंदोळय़ावरील ते दिवस मात्र मागे पडल्याची जाणीव काळजात खोलवर घर करून राहते.

आज वसूबारस...दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाल्याचा आनंद मनात असतानाच सहज लिहता झालो. लहानपणीच्या सुखावणाऱ्या आठवणींनी डोळयांच्या कडा अलगद ओल्या झाल्या. माझे आजोबा डॉ. व्ही. एस. नेर्लेकर - ठोके (तात्या) सांगली जिल्हय़ातील बहुजन समाजातील पहिले एमबीबीएस डॉक्टर. ज्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणचा वटवृक्ष फुलवला, त्या कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांचा हात डोक्यावर व पाठीवर असल्याने जगण्याचे सोने झाले असा भाव त्यांच्या बोलण्यात कायमच असायचा. तात्यांना तीन भाऊ. त्यात थोरले आबा म्हणजे रामचंद्र शंकर ठोके, ते इस्लामपुरातच वास्तव्यास. धाकटे आण्णा म्हणजे मनोहर शंकर ठोके त्यांचा मुक्काम साताऱ्याला. आबा व आण्णांचा तंबाखूचा व्यवसाय असल्याने ते वर्षभर व्यापारानिमित्त देशभर भटकंती करत. अगदी वेगवेगळय़ा ठिकाणी असले तरी हे भाऊ दिवाळीला मात्र एकत्र येत. हे घरपण आणि संस्कार त्यांनी आयुष्यभर कायम जपले. एकत्र कुटूंबातील ‘ती' दिवाळी म्हणजे प्रत्येक क्षण कसा घर भरल्यासारखा आणि मन भरल्यासारखा असायचा. खरं तर सहामाही परीक्षेचे वेळापत्रक आले की, अभ्यासात मन गुंतायचे. अन गुंतलेल्या मनातच दिवाळीत काय काय मज्जा करायची? याची यादी सुरू असायची.

शेवटचे एक दोन पेपर बाकी राहिले असतानाच अभ्यास झाल्यावर किल्ला तयार करण्याकडे आमचा कल असायचा. महाराष्ट्राचे गडकिल्ले म्हणजे आपली अस्मिताच. ही अस्मिता लहानपणापासून संस्कारात रूजल्याने दिवाळीत आपण बनवलेला किल्ला कसा हुबेहूब होईल याची धडपड व्हायची. किल्ल्याला नाव काय द्यायचे? नावाप्रमाणेच तो किल्ला भारदस्त दिसायला हवा यावर आम्ही कधी उंबरठय़ावर तर कट्टय़ावर खल करत बसायचो. चिखलाने भरलेले हात घेऊन भूक लागल्यावर जेवणाच्या ताटाकडे धावायचो. या धडपडीत उत्तम वाघमारेंची सोबत आठवणीतील एक महत्त्वाचा क्षण. वडिल ( डॉ.एन्.टी. घट्टे ) आणि आजोबा दोघेही डॉक्टर असल्याने रूग्णालयातील पूर्वी वापरलेल्या सलाईनच्या छोटय़ा पाईप निर्जंतूक करून त्या किल्ल्यासमोर कारंजा करण्यासाठी वापरायची धडपड मजेशीर असायची. कारण कारंजा सर्वात उंच कसा जाईल हे आनंददायी वाटायचे. मग तयासाठी अगदी घराच्या वरच्या मजल्यावर पिंप ठेवून त्यातून पाईप घेऊन सलाईनच्या सुईतून करंजाला उंची द्यायचो. कारंजे रंगीत होण्यासाठी त्यांत रंग टाकण्याची कल्पनाही कोणीतरी सुचवायचे. किल्ला पुर्ण करायचे मनात कायम असायचे.

पण दररोज नवनवीन कल्पना डोक्यात यायची. त्यामुळे किल्ल्याची बांधणी कायम सुरू असत. गुलाबभई यांच्या मदतीने माळय़ावर जपून ठेवलेला भला मोठा डबा शोधायचा. त्या डब्यात अगदी काळजीपुर्वक ठेवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची सिहांसनावर विराजमान मुर्ती काढायची. मुर्तीसमोर डोकं टेकवून ती किल्ल्यावर सर्वात उंच ठिकाणी प्रतिष्ठापित करायची. मग बाकीचे सैन्य, प्राणी यांच्या जागा किल्ल्यावर स्थिरस्थावर करायच्या. हळीव टाकून किल्ल्यावर आकर्षक वनराई बहरावी यासाठी अगोदरच तयारी करीत असल्याने किल्ल्याचा बाज आणखी लक्षवेधी ठरत. किल्ला झाला की, दरवर्षी नव्याने काही सैन्यदलाची भर पडावी म्हणून पप्पांकडे हट्ट करायचो. तो हट्ट पुरवला जायचा. किल्ल्याच्या पायथ्याला एक मोठी गुहा असायची. त्यामध्ये जंगलाचा राजा म्हणून सिंहाला स्थान द्यायचो. दिवसभर सैन्यांनी बहरलेल्या किल्ल्याकडे कौतुकाने पहात बसायचो. या सगळय़ात एक कोडं मला कायम पडलेलं असायच की, दिवाळी झाल्यावर किल्ल्याच्या गुहेत लक्ष्मी तोटे किंवा बॉम्ब लावून तो उडवला का जायचा? हे कोडं मला आजही सुटलेल नाही. 🤔 सुट्टी लागल्याचा आनंद अन् किल्ला, फटाक्यांचे वाटप याचा गोंधळ आमचा सुरू असतानाच तिकडे आक्काची फराळाची लगबग दिसायची. चिवडा, लाडू, पिवळे धमक मोतीचूर लाडू याचा वास आला की, कसं मस्त वाटायच. फराळाच्या साहित्य खरेदीपासून पप्पांची त्यावर नजर असायची. दिलीप कोळेकर आणि सुनील मानकर या दोन्ही बापूंसह मग एखाद्या दिवशी स्वामी आचारी यांना घरी बोलावून सारा घाट घातला जायचा. पप्पा दवाखान्यातून दुपारी घरी आले की, शेव चिवडय़ाचा घाणा तळला जायचा. शेव चिवडय़ाचा घमघमाटाने जिभेला पाणी सुटायचे. पण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय हात लावण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे देवबाप्पाला नेवैद्ये दाखवून माग आम्हा बाळगोपाळांच्या हाती फराळाचा प्रत्येक पदार्थ खुमासदारपणे दिसायचा. आजोबा डॉ. व्ही. एस. नेर्लेकर यांच्या मित्रपरिवाराचा गोतावळा फार मोठा होता. नातेवाईकांसह त्यांचे मित्र आणि रूग्णांशी जोडलेला जिव्हाळा आम्हाला पहायला मिळायचा आणि दिवाळीत तर त्या सर्वांचा फराळाचा आनंद घेत रंगलेल्या गप्पा आम्ही ऐकत बसायचो.

Advertisement

दिवाळीची पहिले अभ्यंग स्नानाची आम्हाला फार उत्सुकता असायची. अभ्यंगस्नानाला उठणं जीवावर यायचे. थंडीच्या कडाक्यातही पहाटेच्या अंधारात डोळे उघडायचे नाहीत, मात्र पहाटेच्या प्रहरी जागी झालेली आणि रांगोळी आवरलेली आक्का ( आई ) बळबळं उठवायची. उटणे आणि तेल लावून अभ्यंगस्नान घालायची. अभ्यंगस्नान झाल्यावर नवे कपडे घालण्याचा आनंद गगनातही न मावणारा असायचा. नव्या कपडय़ांचे मोठं अप्रुप वाटायचं. हलका फराळ करून तात्यांच्या घरी जायचे. तात्या पण आवरुन आमची वाट पहात बसलेलेच असायचे. पण त्यांचे सारे लक्ष जिन्याकडे असायचे. मग ९ वा. दरम्यान आण्णांची चाहूल लागायची. पहिल्या पायरीवरून "तात्या " म्हणून ते जोराने हाक मारायचे, तात्याही

” या पंत… ” म्हणून तितक्याच प्रेमाने प्रतिसाद दयायचे. मग त्या दोघांच्या गप्पा रंगायच्या. व्यवसायानिमित्त झालेल्या देशभरच्या भटकंतीतील किस्से ऐकताना शिवाय एका एका नव्या गावाचे, शहराचे नाव ऐकताना फार उत्सुकता वाटायची. अजून ऐकत रहावे असे वाटत. आमच्यासाठी तो अनुभव Travel India चॅनेल सारखाच असायचा. रंगलेल्या गप्पा करतच मग आम्ही सारे आबांच्या घरी फराळाला जायचो. तेथे ही पुन्हा हाच गप्पांचा एपिसोड परत व्हायचा. या बंधुप्रेमाची विशेष आठवण म्हणजे आबांच्या पश्चातही तात्यां व आण्णा यांनी ही परंपरा कधीच चुकवला नाही. घरी परत आले की मग, फराळाचे डबे भरायला सुरुवात व्हायची. नातेवाईक, मित्र व पेशंट अशा साऱ्यांना भरभरून पहिल्या दिवशी फराळाचा डबा पोहचला पाहिजे यासाठी आक्का आणि पप्पांचा आटोकाट प्रयत्न असायचा. बरोबर १२ वा. च्या ठोक्याला शलाका ( डॉ. व्ही.आर. शहा यांची कन्या ) यायची. खरे तर ती आक्का पेक्षा १५ - १६ वर्षांनी लहान असेल, मात्र दरवाजातूनच ती मीना म्हणून हाक मारत यायची. मी तर त्यांच्या डब्याची वाटच पहात असायचो. कारण, त्यात खुसखुशीत असे स्वादिष्ट चिरोटे असायचे. हा अनुभवही संस्मरणीयच. सकाळच्या वेळी मित्राच्या घरी फराळावर ताव मारायचा अन दुपारी दिवाळी अंक वाचायचे हे ठरलेलेच. दिवाळी अंकातील विविधता हा ही मोठा औत्सुकत्याचा विषय असायचा. ST स्टँडवरील कुलकर्णी न्यूजपेपर चे कुलकर्णी ८ - १५ दिवस आधी घरी येऊन दिवाळी अंकांची आगाऊ बुकींग घेऊन ठेवायचे. शाळेला सुटी लागली की, बुक केलेल्या अंकांची आतुरतेने वाट बघायचो. पाहिल्यांदा हा अंक कोणाच्या हाती पडतो याची जोरदार स्पर्धा असायची. सायंकाळी घरी आलेल्या मित्र पाहुणे परिवारांची सरबराई करण्यात वेळ जायचा. रात्री फटाके उडवायचे यात दिवस कधी संपला याचा थांगपत्ता पण लागायचा नाही.

दिवाळीतल्या एखाद्या दिवशी सवडीने तात्यांचे भाचे अशोक दुधाणे व वसंत काजवे कोल्हापूरहून स्कूटरवरून यायचे. तेव्हा स्कूटरची फार भारी गंमत वाटायची. मग त्यांचेसाठी मटणाचा फक्कड बेत केला जायचा. रात्री नेमकी लाईट गेलेली असायची, मग गच्चीत चंद्रप्रकाशात जेवणाची पंगत मांडली जायची.या दोघांचे शिक्षण इस्लामपूरला झाल्याने त्यांच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा मिळायचा. दिवाळीच्या सुट्टीत सिनेमा पाहणे हा तर एक आवडीचा विषय. एकत्र बसून सिनेमा पाहणे याची गंमतच भारी. त्यासाठी त्यावेळी व्हिसीआर चार दिवस आधीपासूनच तो बुक करून ठेवला जायचा. सायं. ६ वा. च्या दरम्यान सारे टि. व्ही. समोर बसायचे आणि त्यावेळी गाजलेला एखादा मराठी किंवा हिंदी चित्रपट बघितला जायचा. सिनेमा पहायची उत्सुकता शिगेला पोहचलेली असतानाच ऐनवेळी कॅसेट खराब निघाली की, पुन्हा चिडचिड करत सायकलचे पॅंडल दामटत कॅसेटचे दुकान गाठायचे. कॅसेट बदलून घेताना, मग आता पुन्हा कोणता चित्रपट बघायचा यावर गहन खल व्हायचा... नाना पाटेकर आणि जॅकी श्रॉफ यांचा परिंदा चित्रपट पाहिल्यावर त्यातील हिंसाचार पाहून असा चित्रपट बघायला लावले बद्दल शिव्या खाव्या लागल्या होत्या. ( यातला अण्णा शेठ म्हणजे नाना पाटेकर यांच्याशी आता माझे खूप चांगले सूर जुळले आहेत. )

वर्षावर वर्षे सरत गेली. आबा, आण्णा, तात्या काळाच्या पउद्याआड गेले. तात्यांच्या पश्चात आजोळही दुरावले. काळ सरला, तशी दिवाळीची मजाही बदलली. पोलीस खात्यात आल्यापासून नेहमी जबाबदारीच्या ठिकाणी काम करत असल्याने वारंवार सुटी वा रजा मिळणं दुरापास्त असते. इस्लामपूरला जाणं खूप कमी आणि गेलो तरी काहीं तासांपुरती ती भेट असते. त्यामुळे आता त्या भेटीगाठी होतच नाहीत. प्रत्येकजण ‘बिझी' या शब्दात अडकून पडला आहे. सण उत्सवांवेळी सोशल मिडीयावर मेसेजचा पाऊस पडतो, पण त्यांत प्रेमाचा ओलावा हरवलेला दिसतो. लाडू, चिवडा, चकल्या आता केवळ दिवाळीपुरत्या राहिलेल्या नाहीत. वर्षभरात कधीही तयार करून मिळतो. नवीन कपडे खरेदी करायला दिवाळीची गरज उरली नाही. लहानपणीच्या आमच्या उचापती नव्या पिढीला Very Strenge वाटतात. अधिकारी म्हणून दिवाळी पहाटच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमापासून अगत्याने सर्वत्र बोलवलं जाते, मात्र या साऱ्या गर्दी कोलाहलात लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी वेगाने पुढे येतात आणि मन त्यांतच हरवून जाते. त्यातून बाहेर पडावसंच वाटत नाही.

( माझ्या आठवणींना आमचे इस्लामपूरचे मित्र अन्वर हुसेन यांनी आपल्या कुंचल्यातून रेखाटले आहे. )

मितेश घट्टे
वसुबारस
दि. ९ नोव्हेंबर २०२३.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page