अखेर माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांची, आश्वासने हवेत विरली – सुरेश केसरकर
राज्यातील कामगार वर्गाकडून संतप्त प्रतिक्रिया
पुणे न्यूज एक्सप्रेस :
उचगाव : राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या सातत्यपूर्वक लेखी मागणी व पाठपुराव्यास अनुसरून, माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे, राज्यातील गुणवंत कामगारांच्या पदरी मंत्री सुरेश खाडे यांच्याकडून अन्यायकारक भूमिका घेतली गेली आहे, असे राज्य गुणवंत असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे राज्य सरकारवरती कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक भार पडणार नव्हता.
तसेच इमारत व इतर बांधकाम कामगारांना देखील दिपावली पूर्वी ५ हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले होते, त्याचेही त्यांना विस्मरण झाले आहे. यामुळे माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांची, आश्वासने हवेत विरली आहेत, त्यांनी फक्त घोषणाबाजीचा स्टंट केला होता. कामगार विभागात चुकीच्या पद्धतीने नियुक्ती मिळविलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात लेखी पत्रव्यवहार करूनही, माजी मंत्री सुरेश खाडे यांनी त्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई केली नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया राज्यातील सर्व क्षेत्रातील कामगार वर्गाकडून व्यक्त होत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक , कला क्रीडा, संघटना, आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या कामगारांना, गुणवंत तथा विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन सन १९७९ पासून सन्मानित करण्यात येते. या कार्यक्रमाला महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, केंद्रीय मंत्री तसेच खासदार व आमदार त्याचबरोबर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा मुंबईमध्ये हुतात्मा बाबू गेनू गिरणी कामगार भवन एलफिन्स्टन येथील मैदानावर प्रत्येक वर्षी संपन्न होत असतो.
राज्य शासनाच्या इतर विभागाच्या पुरस्कार्थींना , संबंधित विभागाच्या वतीने विविध सोयी सवलती दिल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवासात सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सन्मानित केलेल्या गुणवंत कामगारांना विविध सोयी सवलती मिळाव्यात, यासाठी सातत्याने माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार, त्याचबरोबर प्रत्यक्ष अभ्यासू तसेच सकारात्मक चर्चा व त्यांच्या आश्वासनाच्या अनुषंगाने त्यांचा भव्य दिव्य सत्कार, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने केलेला होता.
यावेळी मिरज, जि. सांगली येथील सत्कार समारंभ कार्यक्रमात व प्रत्यक्ष किमान पाच ते सहा वेळच्या चर्चेवेळी मा. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी उपस्थित अंदाजे दीड ते दोन हजार कामगारांच्या समोर, मी स्वतः कामगार म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर आमदार झालो आणि कामगार खात्याचा मंत्री झाल्यामुळे, मला कामगारांच्या व्यथा व समस्या जवळून माहित आहेत. असे बोलून उपस्थितांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यातील गुणवंत कामगारांना मी इतर विभागाच्या पुरस्कार्थींप्रमाणे विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहितेपूर्वी सोयी सुविधा देणार असल्याचे वारंवार तोंडी आश्वासन दिले.
याबाबत सातत्याने राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रातील आमदार, खासदार, मंत्री महोदय यांचेवतीने सुद्धा, माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना विनंती वजा लेखी पत्र व्यवहार व प्रत्यक्ष कॉल करणेत आला होता. मात्र माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना आपल्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे, त्यांच्या घोषणा म्हणजे हवेचा बुडबुडाच होता, हे आचारसंहितेपूर्वी त्यांनी कोणतीही निर्णय भूमिका न घेतलेमुळे दिसून आले.
यामुळे राज्यातील सर्व क्षेत्रातील कामगार, माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करीत, त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. एकूणच माजी कामगार मंत्री सुरेश खाडे हे नेहमीप्रमाणे घोषणांचा पाऊस पडणारेच मंत्री ठरले व त्यांची आश्वासने हवेतच विरली, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी सांगितले.
यावेळी संजय सासने, भगवान माने, महादेव चक्के, शिवाजी चौगुले, अनिता काळे, संभाजी थोरात, बाळासाहेब कांबळे, नारायण धनगर, सुभाष पाटील, प्रविण भिके उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636