गझलसादच्या वर्धापनदिनी कवी संमेलन व मुशायरा संपन्न
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर ता.१५ ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ‘ पासून ‘एवढे मी भोगले की मज हसावे लागले ‘पर्यंत मानवी जीवनाचं सूक्ष्म तत्त्वज्ञान मांडणारे कवी श्रेष्ठ सुरेश भट यांचे मराठी कवितेमध्ये अजरामर स्वरूपाचे स्थान आहे. त्यांनी मराठीमध्ये गझल रुजवली आणि अनेक पिढ्या घडवल्या त्यातून मराठी काव्यविश्व समृद्ध झाले. गावोगावी गझलेची बेटे तयार करणारे सुरेश भट हे सामान्यांशी नाळ असणारे अव्वल कलावंत होते.शब्दाशी व माणसांशी प्रामाणिक असणारे ते मोठे कवी होते. त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन ‘ गझलसाद ‘ही संस्था कार्य करत आहे हे कौतुकास्पद आहे. असे मत ज्येष्ठ कवी अशोक भोईटे यांनी व्यक्त केले. ते गझलसाद संस्थेच्या वतीने कविवर्य सुरेश भट यांचा ९२ वा जन्मदिन आणि गझलसाद चा सहावा वर्धापन दिन या कार्यक्रमात कवी संमेलन व मुशायऱ्याच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रारंभी मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत ,प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुभाष नागेशकर व डॉ.दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते अशोक भोईटे यांचा शाल व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘एक रविवार : एक गझल ‘ या युट्युब चॅनेल वरील उपक्रमाचे सलग दोनशे भाग पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अशोक भोईटे यांनी यावेळी गझल हा सर्व काव्य प्रकारातील काव्याचा अर्क म्हणावा लागेल हे स्पष्ट करून मराठी कवितेतील सुरेश भटांचे महत्त्व, गझल या काव्य प्रकाराची वैशिष्ट्ये, अस्सल कलावंत असलेल्या सुरेश भट यांची वैशिष्ट्ये सांगत त्यांच्या आठवणींचा जागर केला. तसेच
आमची सौ माहेरी जाते, सगळ करा पण गुपचूप करा,कलावंत ,आई इत्यादी कविता सादर केल्या.
यावेळी सीमा पाटील,स्वानंद कुलकर्णी , राजेंद्र कोरे,मंगेश रावळ ,सुरेश श्रीखंडे , वैभव चौगुले,अविनाश शिरगावकर,जमीर शेरखान ,हेमंत डांगे ,सारिका पाटील ,डॉ. दिलीप कुलकर्णी,प्रसाद कुलकर्णी,नरहर कुलकर्णी आदींनी आपल्या बहारदार कविता व गझला सादर केल्या. या कविता व गझलांमधून प्रेम ,विरह ,सामाजिकता, शिवरायांची विचारधारा, स्त्रीत्व आणि मातृत्व,वैद्यकीय व्यवसायातील अनुभव, वाढती बेरोजगारी, वाढती जातीयता व धर्मांधता, कलावंताची जबाबदारी , शिक्षण, निवडणुका आणि राजकारण अशा विविध पैलूंवर अतिशय टोकदार असे भाष्य करण्यात आले. यावेळी कृपेश हिरेमठ ,शंकर काटाळे, उर्मिला असगेकर,बाळकृष्ण पाटील , सुरेश पाटील यांच्यासह अनेक काव्य रसिक उपस्थित होते.सारिका पाटील यांनी या मैफलीचे अतिशय आशयसंपन्न सूत्रसंचालन केले. गझलसादचे निमंत्रक प्रा.नरहर कुलकर्णी यांनी आभार मानले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636