गांधी दर्शन शिबीराला चांगला प्रतिसाद
निवडणुकांसाठी रामाचा वापर होणे चुकीचे : डॉ.कुमार सप्तर्षी
सत्याग्रह ही जगाला अनमोल देणगी: डॉ.कुमार सप्तर्षी
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : ‘देशाची प्रगती नागरिकांची विवेक बुद्धी किती जागरूक आहे , किती बंधुभाव आहे, यावर अवलंबून असते. प्रत्यक्षात मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामाच्या नावाने वातावरण निर्मिती करून मती गुंग करण्याचे काम भाजप करीत आहे.निवडणुकांसाठी रामाचा वापर केला जात आहे,हे चुकीचे आहे’,असे प्रतिपादन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केले.या शिबिरात डॉ.सप्तर्षी बोलत होते.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर झाले .राज कुलकर्णी यांनी ‘गांधी,नेहरू समजून घेताना ‘,डॉ. कुमार सप्तर्षी यांनी ‘सत्याग्रहशास्त्र ‘, राजू परुळेकर यांनी ‘भारतीय लोकशाहीवर आलेली संक्रांत आणि विरोधी पक्षांचे पानिपत’ या विषयावर मार्गदर्शन केले.’ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे नववे शिबीर होते.डॉ.उर्मिला सप्तर्षी,अन्वर राजन,महावीर जोंधळे,संदीप बर्वे,अप्पा अनारसे,सुदर्शन चखाले,नीलम पंडित,रोहन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ राजकारणात देव आणल्याने देवाचे देव पण धोक्यात येते. पक्षा बरोबर देवाच्या चरित्राची चर्चा होते.बिन शिखराच्या मंदिराचे उद्घाटन करणे धर्म शास्त्रात बसत नसेल तर भाजप कडून झालेले हे हिंदू धर्माचे अवमूल्यन नाही का ? फक्त निवडणुकांसाठी रामाचा वापर केला जात आहे’, असेही ते म्हणाले.
सत्याग्रहशास्त्र उलगडून सांगताना डॉ.सप्तर्षी म्हणाले,’सत्याग्रह ही जगाला अनमोल देणगी आहे .मला या मार्गामुळे ६२ वेळा अटक झाली. पण सर्व आंदोलने यशस्वी झाली. एकदाही अपयश आले नाही.शारीरिक, सामूहिक बल कमी असले तरी अन्याया विरुद्ध लढा देतो याची प्रेरणा सत्याग्रहाने दिली.सत्याग्रह फक्त परकियां विरुद्ध करायचा हा भ्रम पसरवला जात होता. मात्र, स्वकीय चुकत असतील तर त्याविरुद्ध देखील सत्याग्रह करता येतो आणि केला पाहिजे’.
एडव्होकेट राज कुलकर्णी म्हणाले,’भारताची जडण घडण गांधी नेहरूंनी केली. आज त्यांच्या विचारांची गरज आहे. आत्ताच्या राज्यकर्त्यानी गांधींना स्वच्छता मोहिमपुरते मर्यादित ठेवले आहे. भारतातील धर्म निरपेक्षता आणि लोकशाही हे अद्वैत आहे.भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, हे गांधी नेहरु पटेल यांचे कर्तृत्व आहे. गांधी नेहरूंचे नाव म्हणजे त्या काळातील सर्व नेतृत्वाच्या विचाराचा सार आहे.भारतीय उपखंडात दुसऱ्या कोणत्याही देशाला गांधी नेहरू यांच्या सारखे मोठे नेतृत्व लाभले नाही. तेथील लोकशाहीची बिकट अवस्था आपण समजू शकतो’.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636