‘सचोटीने व्यावसायिकता जपणारे स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व म्हणजे कृष्णकुमार गोयल’- ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांचे गौरवोद्गार


पुणे प्रतिनिधी

पुणे : संघर्ष करत, परिश्रमपूर्वक उद्योगविश्व उभारणारे, सचोटीने व्यवसाय करणारे, मधुरभाषी आणि दातृत्वाने संपन्न, असे कृष्णकुमार गोयल यांचे व्यक्तिमत्व स्फूर्तिदायक आहे, त्यांचा आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी सोमवारी येथे काढले.

पुण्यातील प्रख्यात ‘कोहिनूर’ समूहाचे अध्यक्ष आणि उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार आणि बँकिंग आदी क्षेत्रांमध्ये सातत्याने भरीव योगदान देणारे कृष्णकुमार गोयल यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त सोमवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे विविध ७० संस्थांतर्फे भव्य नागरी गौरव करण्यात आला. यावेळी अरुण फिरोदिया यांच्या हस्ते कृष्णकुमार गोयल यांना पुणेरी पगडी, शाल, तुळशीहार आणि मानपत्र अर्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कृष्णकुमार गोयल गौरव समिती आणि ‘संवाद, पुणे’च्या सहयोगातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते ‘माणसातला कोहिनूर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पत्रकार पराग पोतदार यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, गोयल यांच्या पत्नी राजबाला गोयल, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, राजेश पांडे, सचिन इटकर, सुनील महाजन, भाऊसाहेब भोईर, संजय चोरडिया, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळिक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

फिरोदिया म्हणाले,‘कृष्णकुमार गोयल हे आपल्याकडील ‘कोहीनूर’ आहेतच, आपण ब्रिटिशांच्या राणीकडे कोहिनूरची मागणी कशासाठी करावी? कृष्णकुमार मोजके पण मधुर बोलतात. कुणाला दुखवत नाहीत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने शिक्षण, बांधकाम, बॅंकिंग, हार्डवेअर..अशा कित्येक क्षेत्रांत उद्योगांचे जाळे विस्तारले आहे. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे,’.

डॉ. पी. डी. पाटील यांनी कृष्णकुमार गोयल यांच्यासोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ‘वर्गमित्राचा वाढदिवस साजरा करणे हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांची तडफ, कर्तृत्व, परिश्रम, जिद्द यांचा प्रवास अवर्णनीय आहे. संघर्षातून त्यांनी स्वत:ला घडवत नेले आहे, सिद्ध केले आहे”, असे ते म्हणाले.

Advertisement

डॉ. आगाशे यांनी गोयल यांचा गौरव करताना, ‘एकाच माणसामध्ये इतक्या विविध क्षमता कशा काय असू शकतात, याविषयी आश्चर्य वाटते. माणसांची त्यांनी नेमकी पारख आहे आणि विनम्र स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य आहे,’ असे उद्गार काढले.

मनोगत मांडताना कृष्णकुमार गोयल यांनी भावपूर्ण शब्दांत आपला ७० वर्षांचा प्रवास उलगडला. ‘आपल्या मुलालासुद्धा पैसे कर्जाऊ देणाऱ्या वडिलांकडून मी खऱ्या अर्थाने व्यवसाय, व्यवहार शिकलो. छोटे व्यवसाय करत, अनुभव घेत शिकत गेलो आणि योग्य वेळी व्यवसायात बदल करत, मोठ्या व्यवसायांमध्ये आलो. राजकारण सोडून मी सर्व काही केले. शून्य भांडवलापासून सुरवात करत आजचा धन्यतेचा दिवस गाठला, याविषयी मनात कृतज्ञता आहे. मी अनेक व्यवसाय केले, पण सचोटीने केले. प्रामाणिकपणाने केले. स्पर्धा मोठी होती, तरी याच बळावर पुढे जात राहिलो. विविध क्षेत्रातले मित्र जोडले. त्यांच्या सहकार्यातून विविध कामांसाठी साह्य करता आले. समाजाने मला अपार प्रेम, कौतुक दिले. मी माझ्या कुवतीनुसार या प्रेमाची, कौतुकाची परतफेड करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगून गोयल यांनी नव्या पिढीला ‘सतत स्वत:ला कार्यमग्न ठेवा, परिश्रम करा, स्पर्धेला घाबरू नका, सचोटीने काम करा, असा सल्लाही दिला.

राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन ईटकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘चैत्रबन’ हा अवीट मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
———
चौकट

पुण्याच्या प्रश्नांसाठी ‘कोहीनूर कट्टा’

सत्काराला उत्तर देताना कृष्णकुमार गोयल यांनी पुण्यातील विविध प्रश्न, नागरी समस्या यांची सर्व स्तरांवर चर्चा व्हावी, विविध मार्ग सुचवले जावेत, उपाययोजनांची देवाण घेवाण व्हावी, या हेतूने ‘कोहीनूर कट्टा’ हा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. दर तीन महिन्यांनी असा कट्टा घेण्यात येईल आणि त्यातून पुणेकरांच्या प्रश्नांना, समस्यांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page