नाट्यचित्र सोसायटी पुनर्विकसनाचा वाद उच्च न्यायालयात !
डिम्ड् कन्व्हियन्सला उच्च न्यायालयात आव्हान.
……………………
रहिवाशांवर चिंतेचे सावट
————————————–
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : सोसायटीचे डिम्ड कन्वेयन्स मान्य करण्याच्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,पुणे यांच्या आदेशाला नाट्यचित्र सहकारी गृहरचना संस्था मर्यादित (कलाग्राम) सोसायटी(कोथरूड) च्या मूळ जागामालक व विकसकाकडून उच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे तसेच सोसायटीचे अध्यक्ष-सचिवांनाही प्रतिवादी केले आहे.त्यामुळे ६५ फ्लॅट्स आणि २४ दुकाने असलेल्या या सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि रहिवाशांवर चिंतेचे सावट पसरले आहे.
कोथरूड, डावी भुसारी कॉलनी येथील नाट्यचित्र सहकारी गृहरचना संस्था मर्यादित (कलाग्राम सोसायटी) चे सर्व सभासद तसेच चेअरमन भरत मराठे व सेक्रेटरी अशोक लोहार यांच्या विरोधात, मूळ जागामालक श्री. शिंदे यांच्या वतीने ही याचिका २५ जून २०२४ रोजी दाखल करण्यात आली आहे.पॉवर ऑफ ऍटर्नी होल्डर व मूळ विकसक जी एस असोसिएटस तर्फे कविता श्यामराव गवळी यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी सोसायटीच्या ५/१२/२०१९ च्या डीम्ड कन्व्हेयन्सलाच आव्हान दिले आहे . तसेच एकूण शिल्लक एफ एस आय ५०२ चौरस मीटर कोणाही त्रयस्थ (थर्ड पार्टी ) विकसकास व सोसायटीला वापरण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे सदर सोसायटीच्या पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सोसायटीची आधीच खूप दुर्दशा झाली असून ‘डी’ विंग खचली आहे, त्यामुळे येथील सभासद भयभीत झाले आहेत. त्यातच आता उच्च न्यायालयात ही याचिका दाखल झाल्यामुळे सोसायटीच्या पुनर्विकासाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील रहिवासी भवितव्याबाबत चिंताक्रांत झाले आहेत .
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636