जांभेकरांच्या दर्पणात बघण्याची गरज
पुणे न्यूज एक्सप्रेस :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९०)
prasad.Kulkarni65@gmail.com
आचार्य बाळशास्त्री जांभेकर( १८१० ते १७ मे १८४६ ) हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आहेत. ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ‘ दर्पण ‘हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. ‘ दर्पण ‘ च्या पहिल्या अंकामध्ये आपली भूमिका मांडताना आचार्यांनी म्हटले होते की,’ स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्रपणे व उघडरीतीने विचार करण्यास स्थळ व्हावे या इच्छेने मुंबईत राहणाऱ्या कितीक लोकांच्या मनात आहे की,दर्पण नावाचे एक न्युज पेपर म्हणजे वर्तमानपत्र प्रसिद्ध करावे.या देशाचे लोकांत विलायती विद्यांचा अभ्यास वाढावा आणि तेथील ज्ञान प्रसिद्ध व्हावे.तसेच विलायतेतील विद्या,कला कौशल्ये याविषयीचे लहान लहान ग्रंथ लिहिले जातील.’
वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे १८२६ साली बाळशास्त्रींनी मुंबईच्या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. पण तत्पूर्वीक त्यांनी मोडी व मराठी लेखन, व्यावहारिक गणित ,संत साहित्य, वेद पठण ,संस्कृत स्तोत्रे, पंचमहाकाव्ये असा विविध विषयांचाचौफेर अभ्यास केला होता. मराठीबरोबरच संस्कृत, हिंदी, कन्नड ,बंगाली, गुजराती, लॅटिन, फ्रेंच ,इंग्रजी अशा अनेक भाषा ते शिकले होते. फ्रेंच भाषेतील प्रभुत्वाबद्दल त्यांचा फ्रेंच सरकारने गौरव केला होता. असे अफलातून व्यक्तिमत्व होते ते.इंग्रजी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८३० मध्ये जांभेकर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये उपसचिव म्हणून नेमले गेले. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी काम केले. अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, एलफिस्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक, ज्युनियर स्कूलचे प्राचार्य, कुलाबा वेधशाळेचे संचालक ,मुंबई कोर्टाचे ज्युरी सदस्य अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. हा कालखंड मराठ्यांच्या राज्याच्या अस्ताचा आणि इंग्रजांच्या राज्याच्या प्रारंभाचा कालखंड होता. लोकशिक्षण करण्यासाठी पाश्चात्य विद्येचे आणि विज्ञानाचे महत्व आचार्यांनी ओळखले होते. त्या काळात आलेले छपाईचे तंत्रज्ञान यात मोठी भूमिका बजावेल याची त्यांना खात्री होती.त्यातूनच ते पत्रकार बनले.दर्पणकार आचार्य जांभेकर १९२ वर्षापूर्वी एका विशिष्ट भूमिकेतून सुरू केलेले दर्पण पाक्षिक नंतर साप्ताहिक झाले.हे वृत्तपत्र म्हणजे मराठी पत्रकारितेचा श्रीगणेशा होता. म्हणूनच ६ जानेवारी हा दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. काही सन्माननीय अपवाद वगळता आजच्या पत्रकारितेने दर्पणात बघण्याची नितांत गरज आहे. कारण तिचा चेहरा हरवला आहे असे बहुतांश लोकांना वाटू लागले आहे.
आचार्य जांभेकर हे हाडाचे पत्रकार,संपादक, लेखक, समाजसुधारक,इतिहासकार ,संशोधक ,बहुभाषातज्ञ होते. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या दर्पणकारांचा समावेश महाराष्ट्रातील समाज प्रबोधकांच्या मांदियाळीत अग्रक्रमाने केला जातो.आज एका वेगळ्या अर्थाने जग खेडे बनले आहे. प्रसारमाध्यमे वेगवान झाली आहेत .सोशल मीडियाने सुसाट होत जग जवळ आणलं आहे.या पार्श्वभूमीवर जनकल्याणासाठी वृत्तपत्र प्रसिद्ध करणाऱ्या वृत्तपत्राची मराठीत सुरुवात करणाऱ्या आचार्य जांभेकर यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.वयाच्या बाविसाव्या वर्षी आचार्यांनी दर्पण सुरू केले. तसेच त्या काळातील प्रभाकर आणि उपदेश चंद्रिका या नियतकालिकांना ही आचार्यांचीच प्रेरणा होती.
आचार्य जांभेकर हे बुद्धिप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ होते. पाश्चात्य विद्याचे महत्व त्यांना बरोबर कळले होते. भारताच्या सर्वांगीण बदलासाठी ज्ञान प्रसाराची गरज आहे हे त्यांनी जाणले. विद्या हे बळ आहे, आधुनिक विज्ञानाचे पुस्तकी शिक्षण तर हवेच पण तंत्रज्ञान शिकवणाऱ्या शाळा हव्यात, त्याशिवाय समाजाच्या सुखासाठी विज्ञानाचा उपयोग करून घेता येणार नाही हा द्रष्टा विचार त्यांनी दोन शतकांपूर्वी मांडला होता.यावरून त्यांच्या विचारांची लांबी,रुंदी व खोली दिसून येते.आचार्यांनी गणित, व्याकरण ,भूगोल ,इतिहास, मानसशास्त्र, समाजसुधारणा आदी विषयांवर विविध ग्रंथ लिहिले. बालव्याकरण, इंग्लंड देशाची बखार भाग एक व दोन, गणित शास्त्राच्या उपयोगी विषयीचे संवाद ,भूगोलविद्येची मूलतत्वे, नीतिकथा ,मरे यांच्या इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप ,ज्ञानेश्वरीची चिकित्सक आवृत्ती, हिंदुस्थानचा इतिहास ,हिंदुस्तानातील इंग्लिशांच्या राज्याचा इतिहास, मानसशक्ती विषयीचे शोध, पुनर्विवाह प्रकरण, शून्यलब्धी आणि मूल परिणित या त्यांच्या पुस्तकांच्या नावांवरूनच त्याची प्रगल्भता ध्यानात येते. आचार्यांनी शिक्षणक्षेत्राची महत्त्वाची कामगिरी केली. बोर्ड ऑफ एज्युकेशन सुरु केलेल्या अध्यापक वर्गामागे त्यांचीच प्रेरणा होती. नेटिव्ह जनरल लायब्ररी १८४५ ला सुरू झाली. त्यालाही आचार्यांचेच प्रोत्साहन होते.
बालविवाह प्रथा ,विधवा विवाह स्,त्री शिक्षण याबाबत आचार्यांनी सर्वप्रथम लेखन केले.’ पुनर्विवाह प्रकरण ‘ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘ युरोपीय लोकांमध्ये सर्व स्त्रियांचा विद्याभ्यास पुरुषांप्रमाणेच असतो. त्या कोणत्या बिगडल्या ? हिंदुस्तानाच्या कोणत्या परीशुध्द आहेत ? यास्तव विद्याभ्यास जरूर करावा’. त्यांनी भारताचा इतिहास काटेकोरपणे लिहिला जावा यासाठी शिलालेख ,ताम्रपट अशा प्राचीन इतिहासाच्या साधनांचा सखोल अभ्यास केला. त्याबाबतचे लेख त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात लिहिले.आचार्यांनी प्रारंभ केल्यानंतर आज मराठी वृत्तपत्रसृष्टीचा प्रचंड विस्तार झालेला दिसतो. आचार्य जांभेकर यांची परिवर्तनाची शिकवण ही वृत्तपत्रसृष्टीचा गाभाघटक बनली. अनेक समाजसुधारणा विषयीच्या प्रश्नांची मांडणी त्यांनी केली. अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. ग्रंथालय चळवळीपासून ते विद्यार्थी वस्तीगृहाच्या वाढत्या संख्ये पर्यंतच्या अनेक बाबींचे मूळ दर्पणकारांच्या कार्यात सापडते.
अवघ्या छत्तीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी हिमालयाच्या उंचीचे काम केले.स्वातंत्र्यानंतर लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारली. त्यात वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते.वृत्तपत्र ही लोकविश्वासास उतरलेली आहेत.लोकशिक्षणाचे प्रभावी काम करून समाज परिवर्तनाचे साधन बनल्याची वृत्तपत्रांची क्षमता मोठी आहे. समाजासमोर सर्व प्रकारची वाढती आव्हाने आहेत.सामाजिक विषमता व दुरवस्था वाढते आहे. म्हणूनच प्रबोधनाच्या प्रवासात सर्वात समर्थ माध्यम म्हणून वृत्तपत्राचे महत्व आणि योगदान मोठे आहे. ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ‘ ,हा आगरकरी बाणा पत्रकारितेत गृहीत धरलेला आहे. लोकांचा आजही छाप्यावर विश्वास आहे. एका विचारवंताने म्हटले आहे,’ पत्रकारितेच्या करिअरमध्ये डोनेशन लागत नाही पण डिव्होशन जरूर लागते. समाजामध्ये चांगले आदर्श निर्माण व्हावेत ,ध्येयवादी समाज निर्माण व्हावा यासाठी पत्रकार आणि वृत्तपत्रे कार्यरत असतात.त्याची मुहूर्तमेढ आचार्यांनी रोवली आहे.
आज सोशल मीडिया नावाच्या माहितीच्या मोहजालाने काही प्रश्न तयार केले आहेत. लोकमानस तयार करण्यापासून ते सत्ता निवडी पर्यंतच्या साऱ्या प्रक्रियेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते आहे.एकीकडे हे वास्तव आहे तर दुसरीकडे सोशल मीडियाचा वापर हेरगिरी करण्यापर्यंत आणि सत्तेचा वापर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करण्यापर्यंत मोकाटपणे होतो आहे.ही चिंताजनक बाब आहे.
आज व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली समाज माध्यमातून कोणीही, काहीही मनमानी पद्धतीने व्यक्त होत आहे. देशाच्यावस्वातंत्रालाच भीक म्हणणारे विकृत अभिव्यक्ती स्वातंत्र्य चलतीत आहे. काहीना आपली खरी मते मांडण्याची किंमत प्राण देत चुकवावी लागत आहे. त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आहे. प्रत्येकाला खरे ऐवजी बरे बोलावे,लिहावे लागेल अशा दहशतीच्या वर्तमानात आपण वापरत आहोत. भावना नावाची तरल बाब आणि सद्भावना नावाची मानवी प्रवृत्ती आता अविवेकी झुंडशाहीच्या हातात गेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनादत्त आहे. आपले विचार ,संवेदना आणि भावना व्यक्त करणारे हे स्वातंत्र्य नैसर्गिक आहे.माणूस, प्राणी या बरोबरच वनस्पतीही अभिव्यक्ती जोपासतात हे विज्ञानाने सिद्ध केले.अभिव्यक्ती दडपली जात असताना दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दाखवलेल्या आरशात पाहून वास्तवाचे प्रतिबिंब समजून घेण्याची गरज आहे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे ‘सरचिटणीस’आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच नामवंत लेखक, कवी,गझलकार आहेत.)
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636