खेळाडूंच्या यशामध्ये पालकांचा सिंहाचा वाटा : गोखले
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे —खेळाडूंच्या यशामध्ये त्यांच्या गुरूंबरोबरच त्यांच्या पालकांचाही सिंहाचा वाटा असतो. विशेषतः प्रत्येक पाल्याची आई त्याला जसे कठोर शिस्तीने वागवते तसे त्याचे लाडही करते, प्रत्येक घरामध्ये मातेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे असे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी सांगितले.
क्रीडा भारतीतर्फे अखिल भारतीय स्तरावर दरवर्षी आंतरराष्ट्रीय व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या मातांना जिजामाँ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात (रेणुका स्वरूप प्रशालेचे आवार) टाटा ब्ल्यू स्कोप स्टील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते हा समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभास क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, कोषाध्यक्ष मिलिंद डांगे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय पुरंदरे हेही उपस्थित होते.
गोखले हे महाराष्ट्रीय मंडळ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, आमच्या महाराष्ट्रीय मंडळाचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने आम्ही परिपूर्ण असे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरविले आहे. प्राथमिक शालेय गटातील मुला मुलींमध्ये खेळाची आवड निर्माण होण्याची आवश्यकता आहे. लहानपणीच जर खेळाची आवड निर्माण झाली तर आपोआपच ही मुले आरोग्य दृष्ट्या परिपूर्ण आणि निरोगी राहतील. पालकांनी त्यादृष्टीने अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.
चंद्रशेखर कुलकर्णी यांनी क्रीडा भारतीच्या वेगवेगळ्या उपक्रमांचे कौतुक करीत सांगितले की, समर्थ भारत होण्यासाठी सशक्त भारत असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने क्रीडा भारती तर्फे वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना निश्चितपणे होईल.
यंदाच्या जिजामाँ पुरस्कार विजेत्यांमध्ये पॉवर लिफ्टर डॉ. शर्वरी इनामदार यांची आई डॉ. पूर्णा भारदे, आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू व प्रशिक्षक शिरीन गोडबोले यांची आई सुचेता, वॉल-क्लाइंबिंगपटू ऋतिक मारणेची आई सविता, आंतरराष्ट्रीय अंध बुद्धिबळपटू संस्कृती मोरे हिची आई नीलिमा, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अनिल मुंढेची आई सुरेखा, आंतरराष्ट्रीय मल्लखांबपटू शुभंकर खवले याची आई मनीषा, आंतरराष्ट्रीय तायक्वांदोपटू रुचिका भावे हिची आई सपना, आंतरराष्ट्रीय ज्युदोपटू रेणुका साळवे हिची आई ललिता यांचा समावेश होता. टेनिसपटू अंकिता रैनाची आई ललिता व धावपटू अंकिता गोसावी हिची आई गायत्री या उपस्थित राहू शकल्या नाहीत. या समारंभामध्ये उदयोन्मुख खेळाडू ध्रुवी पडवळ, अथर्व बिडकर, प्रथमेश बिडकर, आयुष देव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
प्रारंभी क्रीडा भारतीचे पुणे शहर अध्यक्ष प्रा.शैलेश आपटे यांनी संस्थेतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा आढावा घेतला. भाऊसाहेब खुणे यांनी आभार मानले. अनुजा दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636