प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या सांस्कृतिक रुजवणीला सलाम
- प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या सांस्कृतिक रुजवणीला सलाम
————————————————
पुणे न्यूज एक्सप्रेस :
प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम सुरू आहेत. यातीलच एका कार्यक्रमात त्यांनी नुकतेच समाजकार्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. कुटुंबाचा हा विश्वस्त निधी असला तरी त्यावर समाजाचा हक्क असेल असे स्पष्ट करून त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे. अंधार उजळण्यासाठी एक पणती जेवढं काम करते तेवढे जरी या निधीतून झालं तरी मला याचा आनंद आहे.’ नावेमध्ये जादा पाणी आणि घरामध्ये जादा पैसा झाला तर पाणी दोन्ही हाताने बाहेर टाकावे व पैसा गरजूंना द्यावा ‘ असे संत कबीर म्हणत त्याला अनुसरून मी हा निर्णय घेतला असेही त्यांनी सांगितले. त्यांनी कर्तुत्व आणि दातृत्व यातून जपलेला सामाजिक भ्रातृभाव फार मौलिक स्वरूपाचा आहे.
माणसाने टोकाची कृतीशीलता जपली पाहिजे हे आग्रही मत प्राचार्य डॉ .लवटे यांनी कृतीत उतरवले.त्यांचे व्यक्तिमत्व कमालीचे प्रेरणादायी आहे. त्यांचे चरित्र,कथा, ललित ,भाषण,काव्य, समीक्षा अशा बहुविध पद्धतीचे लेखन, अतिशय महत्त्वाच्या स्वरूपाचे संपादन कार्य, शिक्षक व प्राध्यापक म्हणून नव्या पिढ्या घडवण्याचे केलेले कार्य ,अनेक सामाजिक संस्थांच्या विकासात व वाढीत दिलेले योगदान आणि एका विशिष्ट टप्प्यावर या सर्व संस्थांचा पदाधिकारी या नात्याने केलेला त्याग, मान्यवर व्यक्ती-विचार आणि वास्तु संग्रहालयांची केलेली निर्मिती हे सारेच जमिनीवर ठामपणे उभे राहून केलेले आकाशाच्या उंचीचे काम आहे. कोल्हापूर भूषण पासून महाराष्ट्र फाउंडेशन ( अमेरिका )पर्यंत विविध संस्थांचे त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार, त्यांच्या पुस्तकांचे झालेले अनुवाद हे सारे त्यांच्या कार्याची नोंद घेणारेच आहे.’खाली जमीन – वर आकाश ‘असताना माणसाने कसे काम केले पाहिजे व करता येते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे हे कार्य असेच अखंड चालत राहो या अमृतमयी शुभेच्छा.
समाजवादी प्रबोधिनीत झालेल्या नुकत्याच झालेल्या त्यांच्या व्याख्यानात ते म्हणाले होते,’संस्कृती ही गतकाळाचे संचित असते. सभ्यता हे तिचे वर्तमान रूप असते. संस्कृती विकसित होणे म्हणजेच ती सभ्यतेत रुपांतरीत होणे असते.आज काळ विपरीत आहे म्हणून सभ्यतेची उजळणी करणे गरजेचे आहे. शिक्षणातून योग्य प्रकारचा संस्कार न झाल्याने भारतीय संस्कृतीची योग्यप्रकारे रुजवण झाली नाही. भारतीय संस्कृती संपूर्ण भारताचा तिच्या वैविध्यासह व्यापक विचार करते. कर्मकांडापेक्षा कर्मपूजेला ती महत्त्वाचे मानते.’ प्राचार्य डॉ.लवटे गेली अनेक वर्षे विविध स्वरूपाच्या सामाजिक कार्याला, संस्थाना, उपक्रमांना सातत्यने आर्थिक सहकार्य करत आलेलेच आहेत. आता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी एक कोटी रुपये अशा कामासाठी देण्याचे जाहीर केले आहे त्याचे सामाजिक, सांस्कृतिक मूल्य मोठे आहे. ते अभिनंदनीय आणि अनुकरणीयही आहे. त्यांच्या सांस्कृतिक रुजवणीच्या कार्याला सलाम…!
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636