शास्त्रीय पद्धतीने शेतीची नियोजन केल्यास ऊस शेती फायदेशीर
आर. बी. खंडागळे यांचे प्रतिपादन: शेडबाळ येथे ऊसपिक परिसंवाद कार्यक्रम
पुणे न्यूज एक्सप्रेस :
शिरोळ/प्रतिनिधी:
आजच्या युवा शेतकऱ्यांनी उसाची शेती कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी कशी होईल याचा विचार करावा. नवनवीन संशोधन व शास्त्रीय पद्धतीने शेतीचे नियोजन केल्यास ऊस शेती फायदेशीर ठरणार आहे. भारतात सरासरी एकरी ३० ते ४० टन उत्पादन मिळते, मात्र विदेशातील ब्राझील, मोरोसिस, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात एकरी १९० टन उसाचे उत्पादन घेतले जाते. अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांचे परिश्रम महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन संकेश्वर येथील निजलिंगप्पा ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आर. बी. खंडागळे यांनी केले.
शेडबाळ येथील शांतीसागर जैन आश्रमात श्री दत्त साखर कारखानाच्यावतीने शेतकरी सभासदाकरिता आयोजित ऊस परिसंवाद कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळ दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील, बाबासाहेब सौंदत्ती यांची प्रमुख उपस्थिती होती.
खंडागळे पुढे म्हणाले, उसाची शेती फायदेशीर करून घेण्याकरिता मशागतीपासून लक्ष देणे गरजेचे आहे. उसाची लागण केल्यानंतर एक एकर क्षेत्रामध्ये ४० ते ४५ हजार रोपे असल्यास त्याची सरासरी एका उसाचे वजन २ ते २.५ किलो झाल्यास त्यातून एकरी सरासरी ८० ते ९० टन मिळते. याकरिता उसाला मुळातून खते देणे गरजेचे आहे. याशिवाय उसाची वाढ व साखरनिर्मिती उसाच्या पानातूनच होते. या पानातून सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते. पान हिरवेगार राहिल याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे सक्षम उसाची निर्मिती होते व वजन वाढते.
दत्तचे शेती अधिकारी एस. एस. हेगाण्णा यांनी ऊस वाढीबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. गणपतराव पाटील यांनी युवा शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये चांगले ऊस पिक कसे घेतले जाऊ शकते याची माहिती सांगितली. प्रारंभी दत्त साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण देसाई, संचालक महेंद्र बागी, अमर यादव, ज्योतीकुमार पाटील, आश्रमचे अध्यक्ष राजू नांद्रे, अजित नरसगावकर, प्रकाश पाटील, सुरगौर पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील मार्गाने यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636