निपाणीचे तहसीलदार बळीगार यांनी दूधगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला.
Tehsildar Baligar of Nipani warned people on the banks of Dudhganga river to be alert.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
बेडकिहाळ प्रतिनिधी – विक्रम शिंगाडे
संततधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम अशातच काळम्मावाडी धरणातून पाणी सोडले जाणार असून यामुळे दूधगंगा नदीची पाणी पातळी येत्या २४ तासात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील जनतेने सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार एम. एन. बळीगार यांनी केले आहे.
काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशावेळी धरणाच्या विद्युतगृहातून १६०० क्युसेक याप्रमाणे केव्हाही पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र पाटबंधारे खात्याच्या कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून उपलब्ध झाली आहे. तसा विसर्ग सुरू झाल्यास येत्या २४ तासात दूधगंगा नदीची पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या जनतेने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. पूरस्थिती निवारण्यासाठी नेमलेल्या पथकाशी संपर्क साधावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. पूरस्थितीमुळे स्थलांतरित होणाऱ्यांची निवारा केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील नदीकाठच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले असून आपत्ती निवारण पथकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे, अशी माहिती तहसीलदार बळीगार यांनी दिली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636