थोर स्वातंत्र्य सैनिक दिनकरराव मुद्राळे : एक उत्तुंग व्यक्तिमत्व
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
१९ जून हा दिवस झुंजार स्वातंत्र्य सैनिक दिनकरराव विठ्ठलराव मुद्राळे उर्फ मुद्राळे अण्णा यांचा जन्मदिन. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी १९ जून १९१८ या दिवशी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज झाले. अण्णांच्या वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचे वडिल कालवश झाले. त्यामुळे साहजिकच त्यांच्या शिक्षणात खंड पडला. त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेचीही आवड होती. ही पेंटिंगची आवड त्यांच्या मनातील सुप्त कलावंताला गप्प बसू देईना. पुढे मिरज व कोल्हापूरला चित्रकलेचे त्यांनी शिक्षण घेतले. कोल्हापूरचे ज्येष्ठ कलावंत चित्रकार बाबा गजबर यांचे ते लाडके शिष्य होते.कोल्हापुरात त्यांनी हे शिकता शिकता सिनेमा व जाहिरातीच्या स्लाईड् करण्याचेही काम केले. त्यांचे नेचर ड्रॉइंगही चांगले होते. तसेच घरातील पारंपरिक व्यवसायामुळे शिवणकामाचे कौशल्यही त्यांच्याकडे अंगभूत होते. त्यामुळे त्यांनी चरितार्थासाठी तेही कौशल्य उपयोगात आणले. जोडीला गांधी टोप्या तयार करून विकणे, खादी कापड विक्री हेही त्यांनी केले.कमवा आणि शिका हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श विचार अण्णांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच इतरांसमोर ठेवला होता .अण्णा कलावंत म्हणून घडत होते. त्यांचा लौकिक वाढत होता. ओळखी वाढत होत्या. अवतीभवतीच्या वातावरणाचे नेमके निरीक्षण ते करत होते. त्यातून त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली.त्यांनी गावच्या ग्रामपंचायत व सोसायटीच्या निवडणुकीत भाग घेतला. वक्तृत्व क्लब ,गणेशोत्सव अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नवे नवे मित्र जोडले.आपल्या नेतृत्वाचा ठसा त्यांनी जनमानसावर उमटवला.
हळूहळू वयाची विशी पार करतानाच ते स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले. भाई माधवराव बागल यांचे विचार ऐकून ते स्वातंत्र्य चळवळीत आले. माधवराव बागल यांच्या घरी निवडक अशा २५/३० प्रमुख लोकांची एक बैठक झाली. त्या सभेमध्ये कोल्हापूर संस्थानातील लोकांना भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असा मागणी अर्ज करण्याचा ठराव करण्यात आला.आणि तो अर्ज संस्थानिकांकडे सुपूर्द करण्यात आला. त्या अर्जावर सही करणाऱ्यांमध्ये मुद्राळे अण्णाही होते. संस्थान काळात संस्थानातील शेतकऱ्यांच्या सारा सवलतीसाठी, भाषण स्वातंत्र्यासाठी संघटित झालेल्या दोन प्रचंड मोर्चांमध्येही त्यांच्या प्रमुख सहभाग होता. त्यासाठी त्यांना सहा महिन्याची शिक्षाही झाली. याच संघटनेचे पुढे प्रजा परिषदेत रूपांतर झाले.भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतानाच कोल्हापुरातील दुसरे ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याशी त्यांचा परिचय झाला. नंतरच्या काळात जवळजवळ पन्नास वर्षे समाजकारणात ,राजकारणात रत्नाप्पा कुंभार व दिनकरराव मुद्राळे ही जोडी एकत्र होती. स्वातंत्र्यलढ्यापासून पुढे अनेक महत्त्वाच्या विधायक कामात ,संस्थांच्या उभारणीत,महत्त्वाच्या घटना प्रसंगात ते परस्परांशी इतके घनिष्ठ होते की ते दोन आहेत असे कोणाला कधी वाटले नाही. मात्र अखेर १९८७ साली ते वैचारिक मतभेदामुळे दूर गेले.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या आंदोलनातून आकाराला येत होते.स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि देशभक्ती या महात्मा गांधीजींच्या विचाराने संपूर्ण भारत जागृत झाला होता. त्यामुळेच अण्णांसारख्या सार्वजनिक जीवनात हिरीरीने भाग घेणाऱ्या तरुण समाजभानी कलावंताने जर गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नसता तरच नवल. अण्णांनी स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून दिले.स्वराज्य आणि खादी यांचा प्रचार करणे व त्या बाजूने लोक उभे करणे हे सर्वात महत्त्वाचे काम होते.म्हणूनच ते फार सावधानतेने करावे लागत असे.अण्णांनी गावोगावी फिरून ते केले.१९४२ या लढ्यात भाग घेतल्याबद्दल २ जानेवारी १९४३ रोजी त्यांना अटक झाली.आणि निरनिराळ्या आरोपाखाली तेरा वर्षाची शिक्षा झाली .मात्र यापैकी साडेतीन वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर सार्वत्रिक सुटकेतून त्यांची सुटका झाली .या शिक्षेच्या काळात तुरुंगात राजकीय वाचन ,चर्चा, आंदोलन, लढा, उपोषण वगैरे सर्व सुरू होते. पुढे एकांत वासाची शिक्षा म्हणून शाहूवाडी तुरुंगात त्यांना नेण्यात आले ही कठोर शिक्षा भोगून अण्णा बाहेर आले.
मे १९४२ अण्णांचा विवाह गांधीवादी पद्धतीने टाकळीच्या गंगू उर्फ शांता सावळाराम गानमोटे यांच्याशी झाला. गानमोटे कुटुंब मूळचे सांगली जिल्ह्यातील बुधगावचे होते. खोची येथील भैरवनाथ मंदिरात हा विवाह झाला. गांधीवादी पद्धतीने एकमेकांच्या गळ्यात सुताचे हार घालून हा विवाह संपन्न झाला. या विवाहाला भाई माधवराव बागल, रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यासह कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या दांपत्याला आठ अपत्ये झाली. विश्वास व आनंद ही मुले तर विजया, सुलभा,पुष्पा, छाया, आशा व प्रमोदिनी या मुली अशी ही आठ भावंडे आहेत.
अण्णांनी प्रजा परिषदेचे तालुका सेक्रेटरी ,अध्यक्ष म्हणून काम केले. १९४८ ला प्रजा परिषदेचे विलीनीकरण होऊन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी निर्माण झाली. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अण्णा संस्थापक सरचिटणीस होते . पुढे १९५५ साली ते एकमताने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले. नंतर माधवराव बागल पक्षातून बाहेर पडले.अण्णा रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या समवेत काँग्रेसचे काम करू लागले. जिल्यातील काँग्रेसच्या उभारणीत पहिली दहा-बारा वर्षे अण्णांनी पूर्ण वेळ देऊन संपूर्ण जिल्हा पिंजून काढत काँग्रेसची पक्ष म्हणून बांधणी उत्तम प्रकारे केली. त्यांची अखंड फिरती लक्षात घेऊन हातकणंगले तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांना मोटार गाडी भेट देण्याचा विचार केला. त्यासाठी निधीही जमवला. कुंभोज येथे कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित केले गेले.त्याला तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई, प्रांतिक काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई हे मान्यवर मार्गदर्शनासाठी आलेले होते. कर्मवीर भाऊराव पाटील हेही त्यावेळी उपस्थित होते. या शिबिरात मुद्राळे अण्णा यांचा यथोचित सत्कार करून त्यांना मोटर गाडी भेट देण्यात आली. तसेच काही मानधनाची सोयही करून देण्यात आली.
१९५७ ते १९६० या काळात अण्णांनी जिल्हा विकास मंडळाचे मानद सचिव म्हणून काम केले. या मंडळामार्फत जिल्हा विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली होती.अण्णांच्या सार्वजनिक कामाची दखल घेऊन करवीर तालुका मतदार संघातून जनतेने १९६२ ते १९६७ साली २३ हजारांचे मताधिक्य देऊन त्यांना विधानसभेवर निवडून दिले.अण्णांनी विधानसभेतही आपल्या ठसा उमटवला.मतदारसंघा बरोबरच जिल्ह्यातील सर्व भागातील विकास कामे ते मार्गी लावत होते.तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद ( ऑगस्ट १९७२ ते मे १९७३) आणि अध्यक्षपद ( मे १९७७ ते जून १९७९ )त्यांनी सांभाळले .या पदावरून त्यांनी जिल्ह्याच्या विविध भागात विकास कामे केली.त्यातून विकास प्रक्रिया गतिमान झाली.कोणतेही पद असो , कोणतेही काम असो ते उत्तम प्रकारे पूर्णत्वाकडे नेण्याचा पिंड हे त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचे गुपित होते .
१९३८ पासून काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कमिटी पासून अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्यत्वापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केले.पक्षांतर्गत व पक्षाबाहेरही सुरुवातीपासून विधायक कार्यकर्ते म्हणून अण्णा सुपरचित होते. शांत, निर्मळ , निस्पृह, नम्र स्वभावामुळे अजातशत्रू हा त्यांचा लौकिक कायम होता.
राजकारणाप्रमाणेच विधायक, रचनात्मक, सहकारी क्षेत्रातील प्रभावी कार्यकर्ते व नेते म्हणून ते ओळखले गेले. १९५५ पासून लिफ्ट एरीगेशन समितीवर त्यांनी काम केले. जिल्ह्यातील साठ- सत्तर गावातील शेतकऱ्यांना संघटित करून शेतीला पाणी देण्याचा प्रश्न त्यांनी या योजनेद्वारे सोडवला.या क्षेत्रातील तज्ञ म्हणून ते ओळखले गेले. जिल्ह्याच्या अर्थकारणाचे केंद्र म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक. या बँकेला पूर्ण जिल्ह्याचा दर्जा मिळाला .त्यावेळी प्रथम संचालक मंडळात त्यांची नेमणूक झाली या बँकेत तब्बल तेरा वर्ष त्यांनी संचालक म्हणून आणि एक वर्ष अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात जिल्हा बँकेने सुलभ कर्ज योजना, संकटकालीन कर्ज योजना, ओव्हर ड्रापिंग कर्ज योजना अशा दूरदर्शी योजना केल्या हे आग्रहाने नमूद करावे लागेल. हातकणंगले तालुका सहकारी खरेदी विक्री संघ ही संस्था त्यांनी स्थापन केली.आजही जिल्ह्यातील एक उत्तम सहकारी संस्था म्हणून तिचा लौकिक आहे.तसेच इतरही अनेक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या त्या सक्षमतेने चालवल्या.तालुका पातळीवरच्या संस्थांपासून नॅशनल को-ऑपरेटिव्हर्स फेडरेशन ( नवी दिल्ली), महाराष्ट्र राज्य कन्झ्यूमर्स फेडरेशन ( मुंबई), गृहनिर्माण मंडळ ( पुणे ) या संस्थातही त्यांनी मोलाची भागीदारी नोंदवलेली आहे. पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक संचालक होते. तसेच स्थापनेपासूनची सलग तीस वर्षे कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी काम केले.
सतत नवनवीन शिकण्याचा ध्यास आणि नवनवीन उद्योग उभारण्याचे कौशल्य अंगी असलेल्या अण्णांना कामानिमित्त प्रदेश दौराही करता आले .मेक्सिको येथे झालेल्या ऊस व साखर उत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्याला ते प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी पॅरिस ,लंडन, न्यूयॉर्क , वॉशिंग्टन, हॉंगकॉंग, सिंगापूर , बँकॉक वगैरे शहरांना भेटी दिल्या. त्याची पाहणी केली. तसेच नॅशनल को-ऑपरेटिव्हर्स फेडरेशनच्या वतीने कंझ्युमर चळवळीची पाहणी करण्यासाठी त्यांनी इंग्लंड, फ्रान्स , अमेरिका ,जपान, मलेशिया, थायलंड अशा अनेक देशांना भेटी दिल्या. या दौऱ्यातून त्यांच्या जे निरीक्षणास आले त्याचे प्रतिबिंब त्या त्या संस्थांच्या कामात पडलेले आपल्याला दिसून येते.
राजकीय ,सहकारी क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे कार्य होते .जातिवाद ,अस्पृश्यता यांच्या निर्मूलनासाठी तर ते प्रथमपासूनच आघाडीवर होते. आचार्य अत्रे यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की,’ वाटेतला खड्डा भरून काढल्या वाचून पाणी पुढे वाहत नाही. त्याचप्रमाणे श्रांत पीडितांना संतुष्ट केल्या वाचून समाजाची प्रगती मुळीच होत नाही. गंगेचा जन्म हिमालयावर झाला पण जनतेला जीवन देण्यासाठी ती खाली उतरली.’ याच विचाराप्रमाणे अण्णा वागत आले. दीन दलितांची त्यांनी केलेली सेवा लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना १९९२ साली दलित मित्र हा सन्मानाचा किताब देऊन गौरविले होते. नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. अण्णांचा लहान चिरंजीव आनंद हा माझा १९८२ पासूनचा जवळचा मित्र. त्यामुळे या कार्यक्रमाला आम्ही चार-पाच मित्र आनंद बरोबर गेलेलो होतो.
वयाच्या पंच्याहत्तरी नंतर अण्णा सक्रिय राजकारणातून बाजूला झाले. आपल्या आवडीच्या अशा सहकारी, सामाजिक ,आर्थिक क्षेत्राशी निगडित असणाऱ्या संस्थात पूर्ण वेळ मार्गदर्शन करीत राहिले.अखेरपर्यंत त्यांची कामाची जिद्द आणि उत्साह कायम होता. २६ नोव्हेंबर २००० रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी अण्णा कालवश झाले. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन, त्यासाठी तुरुंगवास भोगून, स्वतंत्र भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या, भारतीय संविधानातील मूल्यांवर निष्ठा ठेवून त्या पद्धतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अण्णा संविधान दिनीच म्हणजे २६ नोव्हेंबरला कालवश झाले.
१९५५ साली अण्णांनी स्थापन केलेल्या हातकणंगले तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, वडगाव या संस्थेच्या प्रवेशद्वारात त्यांच्या जन्मशताब्दी दिनी म्हणजे २६ नोव्हेंबर २०१८ या दिवशी पुतळा उभारण्यात येऊन अण्णांच्या प्रेरणादायी कार्याची चिरंतन स्मृती जपण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये राजकारण, समाजकारण ,सहकार , कला अशा विविध क्षेत्रात अण्णांनी केलेले काम अतिशय प्रेरणादायी आहे.त्यांच्या कामाचा आदर्श त्या त्या क्षेत्रातील लोकांनी घेऊन प्रामाणिकपणे काम केले.तर नवभारताच्या निर्मितीचे सुंदर स्वप्न सत्यात यायला वेळ लागणार नाही.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636