इस्त्रायल आणि पॅलेस्टाईल संघर्षात हस्तक्षेपाची गरज –
प्राचार्य आनंद मेणसे यांचे प्रतिपादन
इचलकरंजी : , इस्त्रायल आणि पॅलेस्टाईल यांच्यातील वादाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या वादात निष्पाप माणसे बळी पडत आहेत. गाझा पट्टीतील हमास संघटनेने तीन आठवड्यांपूर्वी इस्त्रायलवर अचानक हल्ला केला. त्याला इस्त्राईलने प्रत्युत्तर दिले. इस्राईलच्या तोफा जर गाझा पट्टीत शिरल्या तर मोठा अनर्थ होऊ शकतो. हा प्रचंड रक्तपात थोपवायचा असेल तर योग्य पद्धतीने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे.
युद्ध मुक्त जग निर्माण करण्यासाठी जगातील शांतता प्रेमी लोकांनी संघटित होण्याची गरज आहे,असे मत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ‘गाझा पट्टीतील संघर्ष ‘ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक चौसाळकर होते. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. टी.एस. पाटील यांनी केले.
प्राचार्य आनंद मेणसे म्हणाले इस्त्राईलने अरबांची जमीन बळकावून तेथे आपले राज्य प्रस्थापित केले. अशाप्रकारे राज्य स्थापन करण्याला त्यावेळी महात्मा गांधीजींनी विरोध केला होता. भारताची भूमिका नेहमीच पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारी राहिलेली आहे. पण यावेळी झालेला काहीसा गोंधळ आपण पाहिला.आपल्या एक तासाच्या अभ्यासपूर्ण भाषणात प्राचार्य मेणसे यांनी इस्त्राईल पॅलेस्टाइन वादाचे अनेक कंगोरे स्पष्ट केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा.डॉ.अशोक चौसाळकर म्हणाले, हा प्रश्न बराच जटील आणि गुंतागुंतीचा असून या ठिकाणी सूडचक्राचे राजकारण सुरू आहे. एक कोटी जनतेच्या अस्तित्वाचा हा प्रश्न असून तो शांततेच्या मार्गाने आणि दीर्घकालीन विचाराने सोडवावा लागेल. अन्यथा त्याचे गंभीर परीणाम सर्वांनाच भोगावे लागतील. यावेळी समाजवादी प्रबोधिनीचे सर्व कार्यकारणी सदस्य व प्रबोधिनीच्या सर्व शाखांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636