धमकी, गुंडशाही आणि भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना जीवघेणा धोका ? पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्याला धीरज घाटे समर्थकांकडून धमकीप्रकरण चिघळले


पुणे न्यूज एक्सप्रेस :

 

पुणे – पुणे महापालिकेतील भ्रष्टाचार, वीजचोरी आणि अनधिकृत व्यायामशाळांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांना भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे निकटवर्तीय आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश बोत्रे याने ठेचून टाकण्याची उघड धमकी दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सोशल मीडियावर ही धमकी पोस्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गटांनी ती पोस्ट व्हॉट्सऍप ग्रुपवर सोडून त्याची दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धाडवे यांनी केला आहे.

 

याविषयी पुणे पोलीस परिमंडळ ३ चे डिसीपी संभाजी कदम यांची भेट घेऊन युवक काँग्रेस च्या वतीने तक्रार देण्यात आली यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराले, किशोर मारणे, प्रथमेश आबनावे, लिकायत शेख, विक्रम खन्ना आणि सागर धाडवे उपस्थित होते.

बीड कै. संतोष देशमुख प्रकरणाच्या दिशेने पाऊल ?

या प्रकारामुळे बीड कै. संतोष देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू आठवतो. त्यांनीही बीड मधील राजकीय भ्रष्टाचार,दहशत ,घोटाळे, यावर आवाज उठवला होता . त्यानंतर त्यांच्यावर दडपशाही, धमक्या आणि दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले होते. अखेरीस त्यांची गुन्हेगारांकडून हत्या केली गेली त्यांनतर महाराष्ट्रात त्याविरोधात अनेक आंदोलने उभी झाली.

सागर धाडवे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर वेळेत पोलिसांनी कारवाई केली नाही, तर हेच गुन्हेगार मला देखील कै. संतोष देशमुख यांच्यासारखे करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे माझ्या जिवाला काही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर राहील.”

भ्रष्टाचार उघड झाला, म्हणून ‘ठेचून टाकण्याची’ धमकी?

नवी पेठेतील धर्मवीर संभाजी महाराज विद्यालयाच्या इमारतीत अनधिकृतपणे सुरू असलेल्या व्यायामशाळा व अभ्यासिकांमधील भ्रष्टाचार आणि २०१८ पासून सुरू असलेल्या वीजचोरीचे पुरावे समोर आल्यावर धाडवे यांनी माहिती अधिकारातून ती माहिती मिळवून ती सार्वजनिक केली. यामुळेच भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या समर्थक गणेश बोत्रे याने ९ जून रोजी फेसबुकवर “ही पिल्लावळे कशी ठेचायची आम्हाला माहीत आहे” अशी धमकी पोस्ट केली.

Advertisement

‘मोका’ अंतर्गत कारवाईची मागणी – पोलिसांची कसोटी

याआधीही ४ मे रोजी सागर धाडवे यांना प्रत्यक्ष भेटून आणि फोनवरून धमकावण्यात आले होते. मात्र, पुणे पोलीस यंत्रणेने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने बोत्रेसारखे गुन्हेगार आणि प्रभागातील धीरज घाटे यांचे पोषित गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले आहेत. स्वतः धीरज घाटे यांनी ही पत्रकार निखिल वागळे, प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांवर पुण्यात झालेल्या निर्भय सभेच्या वेळी हल्ला केला होता, त्यामुळे गुन्हेगारी पोसणाऱ्यांवर आणि सहभागी असणाऱ्यांवर युवक काँग्रेसकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाईची जोरदार मागणी केली जात आहे.

“धीरज घाटे यांच्या आशीर्वादानेच हे सुरू” – धाडवे यांचा आरोप

धाडवे म्हणाले, “भ्रष्टाचारविरोधात काम करताना माझ्यावर आणि कुटुंबावर दहशतीचे सावट आहे. माझ्या जिवावर बेतल्यास जबाबदारी धीरज घाटे यांची असेल. माझ्यावर कै.संतोष देशमुखसारखी वेळ येऊ नये म्हणून पोलिसांनी आता तरी जागं व्हावं.”

प्रसारमाध्यमांचाही अवमान – पत्रकार सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

गणेश बोत्रे याने सोशल मीडियावर केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर पुण्यातील प्रमुख वृत्तपत्र आणि पत्रकार बांधवांवर आक्षेपार्ह भाष्य केल्यामुळे, भविष्यात पत्रकार सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

निष्कर्ष – आता तरी पोलिसांनी कारवाई करणार का ?

कै. संतोष देशमुख प्रकरण जिवंत असताना, त्याच धर्तीवर पुढे जाणारी ही घटनांची मालिका राजकीय गुंडशाहीला अधोरेखित करते. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाने ही संपूर्ण बाब गांभीर्याने घेत गुंडप्रवृत्तीवर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, हीच सागर धाडवे यांची मागणी आहे.

वरिष्ठ भाजपनेते ह्या विषयात शांत का ?

भाजप शहराध्यक्ष घाटे यांच्याशी निगडित व्यायामशाळा भ्रष्टाचार, विजचोरी घटना पाहता आणि तक्रारदाराला गुन्हेगारी पद्धतीने दिलेली वागणूक पाहता भाजप नेते ह्या विषयात मौन कधी सोडणार हा प्रश्न आहे.

संपर्क:

सागर धाडवे, सरचिटणीस – युवक काँग्रेस, पुणे

मो.: [९७६२७९२७६९]


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page