निकालांमध्ये घोळ पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन ,दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केले आहे. कॅरी ऑन परीक्षा घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले होते.यावर दोन दिवसात निर्णय घेऊ असे विद्यापीठाने सांगितल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.२०१९ अभ्यास क्रमातील विद्यार्थ्यांना कॅरी ऑन / RE-EXAM ची विशेष संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ‘कॅरी ऑन’ आंदोलन पुकारण्यात आले होते.कॅरी ऑन परीक्षा संदर्भात सातत्याने पाठपुरावा करूनही पुणे विद्यापीठाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे आक्रमक होत शेकडो विद्यार्थ्यांनी आज पुणे विद्यापीठामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन घेऊन हे विद्यार्थी कुलगुरूंना भेटण्यासाठी विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर जमा झाले होते.मात्र त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांकडून रोखण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र झाल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गेट समोर जोरदार घोषणाबाजी करीत गेटवर चढून कुलगुरूंचे कार्यालय असलेल्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केला.
कुलगुरूंनी आम्हाला भेटायला खाली यावं आणि आमच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारावं ही भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आणि विद्यार्थींनी मुख्य इमारतीच्या आवारात ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली.विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका पाहून पुणे विद्यापीठाचे प्रभारी आंदोलन स्थळी भेटण्यासाठी दाखल झाले. कुलगुरू दिल्लीमध्ये असून युसीजीकडे विद्यापीठाचे शिष्टमंडळ गेलेले आहे.येत्या दोन दिवसांमध्ये आम्ही निर्णय घेऊ असं आश्वासन विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636